आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गचाळ कामगिरीत वीरू आघाडीवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅडिलेड - दोन महिन्यांपूर्वी वनडे सामन्यात द्विशतकाचा धमाका उडवणारा ‘हीरो’ वीरेंद्र सेहवाग ऑस्ट्रेलिया दौ-यात ‘झीरो’ ठरला. तीन सामन्यांतील सहा डावांत निराशाजनक फलंदाजीचा कित्ता गिरवणारा वीरू गचाळ कामगिरीमध्येही अव्वल स्थानी आहे. 21 डावात वेगवान गोलंदाजीसमोर गुडघे टेकवून फलंदाजीत 30 च्या सरासरीने धावा काढणा-या वीरूपेक्षा हरभजन सरस ठरला आहे.
सुमार कामगिरीचा फटका बसलेल्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 0-3 ने गमवावी लागली. सलगच्या तीन पराभवांमुळे संघाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. यासाठी वरिष्ठ फलंदाजांनी आपल्या अनुभवातून संघाला तारावे, अशी अपेक्षा केली जात आहे. मात्र, याच अनुभवी फलंदाजांची दौ-यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर चांगलीच ‘कसोटी’ लागली आहे. यामध्ये वीरेंद्र सेहवागची सुमार कामगिरी सर्वांचे लक्ष वेधत आहे.
वेगापुढे लोटांगण!
एकदिवसीय सामन्यात विक्रमी खेळीचे प्रदर्शन करत नवा इतिहास रचणा-या वीरूचा ‘कसोटी’ सामन्यात कस लागत आहे. वेगवान गोलंदाजीसमोर वीरेंद्र सेहवागने लोटांगण घातल्याचे चित्र आहे. आतापर्यंत 21 डावांत खेळणा-या वीरेंद्र सेहवागला 16 वेळा वेगवान गोलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. स्विंग चेंडूसमोर वीरूचा निभावच लागत नसल्याचे वेगवान गोलंदाजांनी दाखवून दिले आहे.
2008 पासून विदेश दौ-यात वीरूची बॅट तळपली नसल्याचे सत्य आहे. तब्बल 4 वर्षांच्या कालावधीत वीरेंद्र सेहवागने न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व ऑस्ट्रेलियामध्ये दौरे केले आहेत. या दौ-यातील 21 डावांत वीरूला फलंदाजीची संधी मिळाली. मात्र, निराशाजनक कामगिरीचे प्रदर्शन करणा-या वीरूला यामध्ये 500 धावांचा पल्लादेखील गाठता आला नाही. यामध्ये त्याने केवळ दोन अर्धशतके ठोकली आहेत. अशा प्रकारे सुमार फलंदाजी करणा-या वीरूपेक्षा हरभजनने यादरम्यान सरस कामगिरी करून दाखवली आहे.