आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरू, जहीरला पुन्हा संधी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हुबळी - भारत अ संघ आणि वेस्ट इंडीज अ संघ यांच्यातील तिस-या चारदिवसीय सामन्याला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. भारताकडून वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, जहीर खान आणि चेतेश्वर पुजारा खेळणार आहेत. सुमार कामगिरीमुळे हे चार दिग्गज खेळाडू सध्या अडचणीत आहेत.


सलामी सामना जिंकून पाहुण्या वेस्ट इंडीजने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसरा चारदिवसीय सामना ड्रॉ झाला. मालिका गमावण्याची नामुष्की टाळण्यासाठी भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि जहीर खानला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. शिमोगा येथील दुस-या सामन्यात सेहवाग आणि गौतम गंभीर सपशेल अपयशी ठरले होते. यामध्ये गंभीरने 11 आणि सेहवागने सात धावांची खेळी करून सर्वांची निराशा केली होती.
सेहवागला 30 कसोटी डावांत एकही शतक झळकवता आले नाही. दुसरीकडे जानेवारी 2010 पासून गंभीरला 40 कसोटी डावांत धावांचा तिहेरी आकडा पार करता आला नाही.


एका वर्षानंतर पहिला सामना खेळणा-या वेगवान गोलंदाज जहीर खानला दुस-या सामन्यात 93 धावा देऊन दोन विकेट घेता आल्या. जहीर ऑक्टोबर 2010 नंतर कोणत्याही कसोटी डावात पाच विकेट घेऊ शकला नाही. वर्ल्ड कप 2011 नंतर त्याने केवळ सात कसोटींत भारताचे प्रतिनिधित्व केले.
भारत अ संघाकडून कर्णधार चेतेश्वर पुजारादेखील दमदार फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने मागील तीन डावांत केवळ 45 धावा काढल्या आहेत.


सेहवाग आणि गंभीरशिवाय पुजाराला सामन्यात जगदीश, अभिषेक नायर आणि उदय कौलकडून मोठ्या खेळीची आशा आहे. या तिघांनी गत सामन्यात अर्धशतकी खेळी करून पाहुण्या विंडीज संघाचे विजयाचे मनसुबे उधळून लावले. या सामन्यात चांगली कामगिरी करून टीम इंडियासाठी मार्ग मोकळा करण्याची ही तिघांसाठी संधी आहे.


भारतीय अ संघात बदलाची शक्यता!
भारतीय संघात थोडा बदल होण्याची शक्यता आहे. पारस डोग्रा, मधल्या फळीतला शेल्डन जॅक्सन आणि मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीला संधी मिळू शकते. दुसरीकडे वेस्ट इंडीजला मालिका जिंकण्यासाठी तिसरा सामना केवळ ड्रॉ करण्याची आवश्यकता आहे. मात्र, या संघाचा भर विजय मिळवण्यावर असेल. या संघातील फलंदाजही सध्या जबरदस्त फॉर्मात आहेत.


संभाव्य संघ
भारत अ संघ : चेतेश्वर पुजारा (कर्णधार), गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, अभिषेक नायर, पारस डोग्रा, उदय कौल, मोहंमद कैफ, भार्गव भट्ट, परवेज रसूल, ईश्वर पांडे, मोहंमद समी, धवल कुलकर्णी.
वेस्ट इंडीज अ संघ : किर्क एडवडर्स (कर्णधार), केरोन पोलार्ड, क्रेग बे्रथवेट, जोनाथन कार्टर, शेल्डोन कॉट्रेल्ल, नरसिंग, असद फुदादीन, लियोन जॉन्सन, निकिता मिलर, वीरासामी पेरमॉल, शिलिंगफोर्ड, वाल्टन.