सोच्ची - भारताचा
विश्वनाथन आनंद हा तब्बल सहाव्यांदा विश्वविजेतेपदासाठी सज्ज झाला आहे. त्याची लढत आता वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनशी होईल. शनिवारपासून सुरू होणा-या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या जेतेपदासाठी या दोन तुल्यबळ खेळाडूंमध्ये चुरस रंगणार आहे. एकूण १२ फे-यांमध्ये आनंद आणि कार्लसनची लढत होईल. यातील प्रत्येक फेरीतून विजेत्यास एका गुणाची कमाई करता येणार आहे. तसेच अनिर्णीत राहिलेल्या लढतीतून दोन्ही खेळाडू अर्ध्या गुणांचे मानकरी ठरतील. यात ६.५ गुणांची कमाई करणारा खेळाडू विश्वविजेतेपदाचा मानकरी ठरेल.
समान सहा गुणांची दोन्ही खेळाडूंनी कमाई केल्यास जेतेपदाचा निकाल ट्रायब्रेकरवर लावण्यात येईल. या वेळी विजेत्यास १० कोटींचे बक्षीस देऊन गौरवण्यात येईल. तसेच उपविजेता खेळाडू पाच कोटींच्या बक्षिसाचा मानकरी ठरेल. गतवर्षी चेन्नई येथे कार्लसनने पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन आनंदला धूळ चारली होती. आता आनंदचा कार्लसनला या पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न असेल.
पाच वेळा आनंद विश्वविजेता
२००० : अॅलेक्सी शिरोव्हचा (रशिया) पराभव.
२००७ : व्लादिमीर क्रामनिक (रशिया) आणि बोरिस गेलफांद (बेलारूस) यांना हरवले.
२००८ : व्लादिमीर क्रामनिकचा पराभव.
२०१० : वेसलिन टोपालोव्ह (बल्गेरिया) ची हार.
२०१२ : बोरिस गेलफांदला धूळ चारली.
१० कोटींचे विजेत्यास बक्षीस
०५ कोटींचा उपविजेता मानकरी
१२ फे-यांमध्ये रंगणार झुंज
६.५गुणांचा मानकरी ठरणार विजेता