आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वानखेडे लाइव्ह : वानखेडेच्या विकेटला स्पर्श करून मानवंदना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुशिक्षित आणि सुसंस्कृत दोन वेगळ्या गोष्टी असतात, याचे उदाहरण आज सचिनने उपस्थित प्रेक्षकांना आणि जगातील तमाम क्रिकेटप्रेमींना दाखवून दिले. वेस्ट इंडीजवर भारतीय संघाने विजय प्राप्त केल्यानंतर सचिन आठवण म्हणून एक स्टम्प घेऊन पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला. स्टेडियममधील सगळे प्रेक्षक उभे राहून आपल्या आवडत्या खेळाडूला मानवंदना देत होते. टाळ्यांचा कडकडाट आणि सचिन.. सचिन.. असा जयघोष सुरू होता. सचिनच्या डोळ्याच्या कडा ओलावल्यासारख्या दिसत होत्या. उपस्थित प्रेक्षकांना हात उंचावून अभिवादन करत सचिन मैदानाबाहेर गेला आणि प्रेक्षकातील काही जणांचा बांध फुटला. काही वेळाने पारितोषिक वितरण समारंभासाठी दोन्ही संघ बाहेर आले.
समारोप सोहळ्यानतंर उपस्थित प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी सचिन फेरी मारण्यास निघाला. सर्वांच्या पुढे अंगावर तिरंगा रंगवलेला तरुण हातात ध्वज घेऊन धावत होता. त्यामागोमाग संघाचे खेळाडू, पदाधिकारी होते. सचिनदेखील धावत होता. इतक्यात कोहली व धोनी यांनी सचिनला खांद्यावर घेऊन धावण्यास सुरुवात केली. आसू व हसू यांचे सुंदर मिश्रण सचिनबरोबर सर्वांच्या चेह-यावर दिसत होते. वानखेडेची फेरी पूर्ण झाल्यानंतर सचिनला खांद्यावरून उतरवण्यात आले. आणि अचानक सचिन पुन्हा प्रिय विकेटवर पोहोचला. आजी-माजी खेळाडू आश्चर्याने पाहत होते. काही क्षण विकेटवर उभा राहिला व सचिन खाली वळला. दोन्ही हातांनी विकेटला स्पर्श करून त्याने मानवंदना दिली. जणू काही तो 24 वर्षे साथ दिलेल्या आपल्या कुटुंबातील एका घटकाबद्दल प्रेम, आदर व कृतज्ञता व्यक्त करत होता. इतका वेळ ब-याच प्रेक्षकांनी आपले थोपवून धरलेले अश्रू चेह-यावरून ओघळत होते.