आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Warm up Match: Finally India Won Against Afghanistan, Rohit Hit Century

अखेर 'आप'ण जिंकलो, रोहितच्या शतकाने टीम इंडियाच्या विजयाची प्रतीक्षा संपवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - ऑस्ट्रेलिया दौ-यात जवळपास ८० दिवसांपासून विजयासाठी आतुर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाची विजयाची प्रतीक्षा अखेर मंगळवारी अफगाणिस्तानला पराभूत करून संपली. विश्वचषकाच्या अखेरच्या आणि दुस-या सराव सामन्यात भारतीय संघाने १५३ धावांनी शानदार विजय मिळवला. आता विश्वचषकात भारताचा पहिला सामना रविवारी पाकिस्तानसोबत होणार आहे. येत्या १४ फेब्रुवारीपासून विश्वचषकाला प्रारंभ होत आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया दौ-यात भारताचा हा पहिला विजय ठरला. यापूर्वी सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला १०६ धावांनी हरवले होते. असे असले तरीही टीम इंडियाला फार हुरळून जाण्याची गरज नाही. कारण, हा विजय म्हणजे क्रिकेटच्या क्षेत्रात वाघाने मांजरीची केलेली शिकार, असेच आहे. एखाद्या मोठ्या संघाविरुद्ध विजय अधिक फायद्याचा ठरला असता.
भारताने अफगाणिस्तानसोबत प्रथम फलंदाजी केली. भारतीय संघाची सुरुवात या वेळीही नेहमीप्रमाणे चांगली झाली नाही. सामन्यात सलामीवीर शिखर धवन अवघ्या ४ धावा काढून बाद झाला. खेळपट्टीवर फक्त हजेरी लावण्यासाठी तो आल्याचे वाटत होते. या वेळी भारताच्या धवनला हमीदने त्रिफळाचित करून संघाला महत्वाचा बळी मिळवून दिला. त्यानंतर तिस-या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीलासुद्धा मोठी खेळी करता आली नाही. तो देखील धवनसारखा सपशेल अपयशी ठरला. कसोटीत जबरदस्त फॉर्मात असलेल्या विराटला वनडेत हा फॉर्म कायम ठेवता आला नाही. दुबळ्या अफगाणविरुद्ध तो अवघ्या ५ धावा काढून बाद झाला. यासह त्याने सर्वांनाच निराश केले. सामन्यात कोहलीला अफगाणिस्तान संघाच्या दौलत झरदानने बाद केले. टीम इंडिया २ बाद १६ धावा अशी संकटात सापडली होती. सलामीचे दोन अव्वल फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने भारतीय संघाला मोठा फटका बसला. त्यामुळे संघ अडचणीत सापडला. मात्र, यानंतर रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनी भारताचा डाव सावरला.

रोहित-रैनाची शतकी भागीदारी :संकटात सापडलेल्या भारतीय संघाकडून सलामीवीर रोहित शर्माने झंझावाती १५० धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळेच भारताला ५ बाद ३६४ धावा काढून डाव सावरता आला. या वेळी रोहितने १२२ चेंडूंचा सामना करताना १३ चौकार आणि ७ षटकारांसह ही खेळी केली. रोहित आणि रैना यांनी तिस-या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी करून डाव सावरला. सामन्यात सुरेश रैनानेसुद्धा ७५ धावा ठोकल्या. त्याने ७१ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार, ५ चौकारांसह ही वेगवान खेळी केली. यानंतर रोहितने अजिंक्य रहाणेसोबत डाव सावरला. भारताच्या २६९ धावा झाल्या असताना रोहित चौथ्या विकेटच्या रूपाने बाद झाला. एकवेळ तर अशी होती की रोहित सराव सामन्यातही द्विशतक ठोकतो की काय, असे वाटत होते. मात्र, तो १५० धावांवर बाद झाला. रहाणेने अवघ्या ६१ चेंडूंत २ षटकार, १२ चौकारांसह नाबाद ८८ धावा चोपल्या.

रोहितच्या १५० धावा, रहाणेने ८८, रैनाने काढल्या ७५ धावा
अफगाणचा संघर्ष : प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघाने ८ बाद २११ धावा काढल्या. अफगाणकडून सामन्यात तिस-या क्रमांकावर आलेल्या नवरोज मंगलने ६० धावा काढल्या.
धोनी, विराट अपयशी : या सामन्यात भारताच्या रोहित शर्माच्या फिटनेसशी संबंधित सर्व शंका दूर झाल्या. मात्र, शिखर धवन, विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी अपेक्षेनुसार धावा काढू शकले नाहीत.

गोलंदाजीही समाधानकारक : सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी समाधानकारक झाली. यामध्ये वेगवान गोलंदाज उमेश यादव, मोहित शर्मा, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या सर्वांना विकेट मिळाल्या.
पुढे वाचा धावफलक