आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • West Indies Crush Bangladesh By 73 Runs News In Marathi

वर्ल्डकप टी-20 : विंडीजकडून बांगलादेश पराभूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - भारताविरुद्ध पराभवानंतर वेस्ट इंडीजने मंगळवारी आयसीसी वर्ल्डकप टी-20 मध्ये कात टाकल्यासारखी कामगिरी केली. या टीमने बांगलादेशचा 73 धावांनी पराभव केला. सॅम्युअल बद्री (4/15), सांतोकी (3/17) आणि रस्सेल (2/10) यांच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर विंडीजने सामना जिंकला. विंडीजचा वर्ल्डकपमधील हा पहिला विजय ठरला. आता वेस्ट इंडीजचा तिसरा सामना 28 मार्च रोजी ऑस्ट्रेलियाशी होईल. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने 7 बाद 171 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने 19.1 षटकांत अवघ्या 98 धावांत गाशा गुंडाळून पराभव पत्करला.

धावांचा पाठलाग करणार्‍या बांगलादेशची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर तमीम इकबाल (5) आणि अनामुल हक (16) झटपट तंबूत परतले. त्यापाठोपाठ शाकीब-अल-हसन भोपळा न फोडताच परतला. अखेर कर्णधार मुशाफिकुर रहीमने संघाची बाजू सावरली. त्याने 22 चेंडूंचा सामना करताना दोन चौकार आणि एका षटकारासह 22 धावा काढल्या. मात्र, त्यालाही फार काळ आव्हान टिकवून ठेवता आले नाही.

तत्पूर्वी,सलामीवीर क्रिस गेल आणि ड्वेन स्मिथच्या दमदार फलंदाजीच्या बळावर वेस्ट इंडीजने बांगलादेशविरुद्ध 7 बाद 171 धावा काढल्या. स्मिथने अर्धशतक ठोकताना 72 धावांची खेळी केली, तर गेलने 48 धावांचे योगदान दिले.

बांगलादेशचा कर्णधार मुशाफिकुर रहीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. वेस्ट इंडीजच्या सलामीवीरांनी बांगलादेशची गोलंदाजी फोडून काढली. क्रिस गेल आणि ड्वेन स्मिथ यांनी 11.5 षटकांत 97 धावांची मजबूत सलामी दिली. स्मिथ अर्धशतक काढून बाद झाला. त्याने 43 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 72 धावा काढल्या. गेलचे अर्धशतक 2 धावांनी हुकले. त्याने 48 चेंडूंत 3 चौकार, 2 षटकारांच्या मदतीने 48 धावा काढल्या. वेस्ट इंडीजचे इतर फलंदाज अपयशी ठरले. कर्णधार सॅमीने नाबाद 14 आणि सॅम्युअल्सने 18 धावा काढल्या. सिमन्स, डॅरेन ब्राव्हो, आंद्रे रसेल आणि दिनेश रामदीन या चौघांना तर भोपळासुद्धा फोडता आला नाही.

बद्रीचा बळींचा चौकार
वेस्ट इंडीजचा सॅम्युअल बद्री मंगळवारी बांगलादेशविरुद्ध सामन्यात चांगलाच फॉर्मात होता. त्याने धारदार गोलंदाजी करताना बळींचा चौकार ठोकला. त्याने चार षटकांत 15 धावा देत शानदार चार विकेट काढल्या. त्याने सलामीवीर इकबाल, कर्णधार रहीम, सब्बीर रहीम आणि महमुद्दालहला बाद करून तंबूत पाठवले. त्यापाठोपाठ सांतोकीने तीन विकेट घेतल्या. त्याने सलामीवर अनामुल हक, शाकीब अल हसन आणि मोर्तझाला बाद करून संघाला महत्त्वाचे बळी मिळवून दिले. तसेच रस्सेलने 2.1 षटकांत 10 धावा देऊन दोन गडी बाद केले. सुनील नरेनला मात्र चार षटकांत 17 धावा देऊन एक गडी बाद करता आला.


संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडीज : 7 बाद 171 धावा, बांगलादेश : सर्वबाद 98 धावा