आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • West Indies Give 322 Runs Challenge To India, Divya Marathi

धोनीचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय सपशेल चुकवला , विंडीजने यजमान भारतीय गोलंदाजांना धो-धो धुतले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : वेस्ट इंडीजचा मधल्या फळीचा फलंदाज सॅम्युअल्सने तुफानी खेळी करीत शतक ठोकले. शतकादरम्यान चौकार खेचताना सॅम्युअल्स.
कोची - मर्लोन सॅम्युअल्सचे नाबाद शतक (१२६) आणि दिनेश रामदीनच्या दणदणीत अर्धशतकाच्या (६१) बळावर वेस्ट इंडीजने भारतासमोर ३२२ धावांचे तगडे आव्हान उभे केले. ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्यांनी ५० षटकांत ६ गडी गमावले, ते नावालाच. कारण सॅम्युअल्सने मैदानभर चौफेर फटकेबाजी करून कर्णधार धोनीचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय सपशेल चुकवला.

टॉस हरल्यानंतर विंडीजची सुरुवात खराब झाली. ३४ धावसंख्येवरच त्यांनी कर्णधार ब्राव्होच्या (१७) रूपात पहिला सलामीवीर गमावला. त्यानंतर स्मिथ आणि दुस-या ब्राव्होने धावसंख्या शंभरीनजीक पोहोचवली. ९८ वर स्मिथच्या रूपाने त्यांचा दुसरा सलामीवीरही धारातीर्थी पडला. आयपीएलमध्ये खो-याने धावा जमवणा-या या फलंदाजाला वनडेत मोठी खेळी करता आली नाही, तरीही त्याने ४ चौकार, २ षटकार खेचून भारतीय गोलंदाजांची धुलाई केलीच. यानंतर सॅम्युअल्सचा झंजावात सुरू झाला जो अखेरच्या चेंडूपर्यंत कायम होता. १२० वर पाहुण्यांनी दुसरा ब्राव्होही गमावताच धावगतीला वेसण बसेल असे वाटले होते. मात्र, रामदीनने दणदणीत अर्धशतक ठोकून गोलंदाजांना हताश केले. धावसंख्या तीनशेनजीक (२८५) गेल्यावर रामदीन बाद झाला; पण तेव्हा विंडीजने बाजू मजबूत केली होती. घणाघाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेली पोलॉर्ड (२) - रसेल (१) ही उंचीपुरी जोडी आल्यापावली परतली खरी; पण शेवटच्या काही षटकांत सॅम्युअल्सने गगनचुंबी षटकारांची बरसात करून धावसंख्या ३२१ (६ बाद) वर नेऊन ठेवली. सामन्यात भारताचे क्षेत्ररक्षणही सुमार दर्जाचे होते.

सॅम्युअल्स सुसाट
पहिली १६-१७ षटके संपल्यानंतर सुसाट सुटलेला सॅम्युअल्स अखेरच्या चेंडूपर्यंत भारतीय गोलंदाजांची पिसे काढत होता. शतकी खेळीत त्याने ११ चौकार आणि ४ षटकार लगावले. खासकरून मोहंमद शमीविरुद्ध त्याने हल्लाबोल केला. हाणामारीच्या षटकात त्याच्या आक्रमकतेने पाहुण्यांना सव्वातीनशेनजीक पोहोचता आले. भारतीयांवर दबाव वाढवता आला.

दिनेश रामदीनही जोरात
दिनेश रामदीनने मोक्याच्या क्षणी सॅम्युअल्सला दिलेली साथ कौतुकास्पद होती. विंडीजला एका मोठ्या भागीदारीची निकड रामदीन-सॅम्युअल्सने बरोबर ताडली. १२० वर तिसरा गडी बाद होताच या दोघांनी २८५ पर्यंत धावसंख्या नेली. रामदीनने ६१ धावा ठोकल्या, त्या ५ चौकार आणि २ षटकारांनिशी.

शमी यशस्वी, पण महागडा
शमीने ४ गडी बाद केले, यासाठी ९ षटकांत ६६ धावा त्याला मोजाव्या लागल्या. भुवनेश्वरला बळी मिळाला नसला, तरी त्याने गोलंदाजी तोलून-मापून केली. १० पैकी १ षटक निर्धाव टाकत त्याने अवघ्या ३८ धावा मोजल्या. मोहित शर्माने ९ षटकांत ६१ धावा दिली. त्याची झोळी रिकामीच राहिली. जडेजा, अमित मिश्रा या फिरकीपटूंची जादूही चालली नाही. दोघांनी १-१ बळी मिळवला; पण धावांची लयलूटही केली.