आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेटपटू परवेझ रसूलवर राजकारण का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झिम्बाब्वे दौ-यात पाच वनडे क्रिकेट सामन्यांत बाहेर बसूनही परवेझ रसूल निराश झाला नाही आणि प्रिटोरिया येथे दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळताच त्याने भारत अ संघासाठी दोन विकेट घेतल्या. यानुसार जम्मू-काश्मीर रणजी संघाचा ऑफस्पिनर परवेझ रसूलला अखेर भारत अ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. रसूलला निराश होण्याची गरज नाही. त्याला दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिकेत संधी मिळेल, असे विराट कोहलीने म्हटलेसुद्धा होते.


कोहलीने म्हटले होते की, मी अमित मिश्रा किंवा रवींद्र जडेजाच्या जागी रसूलला संधी देऊ शकत नाही. झिम्बाब्वेत काही असे खेळाडूसुद्धा खेळले, ज्यांना प्रदीर्घ काळापासून प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती, असेही कोहलीने म्हटले होते. रसूलला झिम्बाब्वे दौ-यातील पाच वनडेत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न मिळाल्याने जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून रसूलला त्याचा आत्मविश्वास मोडण्यासाठी झिम्बाब्वे दौ-यात नेले होते का ? असा प्रश्न निर्माण केला होता. मात्र, प्लेइंग इलेव्हनमध्ये राजकीय दबावामुळे नव्हे, तर मेरिटच्या आधारावर निवड होते, हे बहुदा अब्दुल्ला विसरले. उमर अब्दुल्ला यांना बहुदा मीडियाला उत्तेजित करायचे होते. मात्र, कोणत्याही खेळाडूची एखाद्या राजकीय व्यक्तीच्या दबावामुळे निवड होत नाही आणि दबावात येऊन त्याला खेळण्याची संधीसुद्धा दिली जात नाही, हे ते विसरले. सर्वकाही मेरिटवर अवलंबून असते. उमर अब्दुल्ला यांनी रसूलला राजकीय प्यादे बनवू नये. रसूलसाठीही हे योग्य राहील.


यात शंका नाही की, राष्‍ट्रीय संघात स्थान मिळवणारा रसूल जम्मू-काश्मीरचा पहिला क्रिकेटपटू आहे. त्याची निवड इतर कोणत्याही किंवा राजकीय कारणामुळे झाली नाही. आपल्या मेहनतीच्या बळावर त्याने भारतीय संघात स्थान मिळवले. मागच्या सत्रात त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत चांगली कामगिरी केली होती. बिशनसिंग बेदी यांनी एक वर्ष जम्मू-काश्मीर संघाला प्रशिक्षण दिले आहे. 24 वर्षीय या युवा ऑफस्पिनरमध्ये खूप प्रतिभा आहे. बेदी यांच्या मते रसूल चेंडूला नियंत्रितपणे स्पिन करण्यात सक्षम आहे. दुसरीकडे संघ निवडीबाबत बोलायचे झाल्यास आपली निवड समिती 2015 चे वर्ल्डकप समोर ठेवून प्रत्येक खेळाडूचा सूक्ष्म अभ्यास करून संधी देत आहे. अशा परिस्थितीत रसूलला झिम्बाब्वे दौ-यात संधी मिळाली असती तर काय बिघडले असते? झिम्बाब्वे दौ-यात फक्त रसूलला संधी मिळाली नाही. नव्या प्रतिभेला, युवा खेळाडूंना संधी देण्याऐवजी आपली टूर निवड समिती दुबळ्या झिम्बाब्वेला व्हाइटवॉश देण्याला अधिक महत्त्व देत होती, असे वाटते. यामुळेच बहुदा रसूलला संघाबाहेर बसावे लागले. असो. रसूलकडे प्रतिभा आहे आणि त्याला पुढेही संधी मिळेल. टीम इंडियाला आर. अश्विनसह आणखी एक योग्य ऑफस्पिनर मिळाला आहे, असे समजूया.