आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विम्बल्डन टेनिस: विजेतेपदाची दावेदार सेरेना विल्यम्सचा सबाईन लिसिकीकडून पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये स्टार खेळाडूंच्या पराभवांची मालिका अजूनही सुरूच आहे. राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि मारिया शारापोवानंतर आता वर्ल्ड नंबर वन आणि गत चॅम्पियन सेरेना विल्यम्सही स्पध्रेतून बाहेर झाली आहे. अमेरिकन स्टार सेरेनाला जर्मनीच्या सबाईन लिसिकीने चौथ्या फेरीत 6-1, 1-6, 6-4 ने पराभूत करून धक्कादायक विजय मिळवला. महिला गटातून ली ना, पेत्रा क्वितोवा आणि पुरुष गटात स्पेनच्या डेव्हिड फेरर यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

महिला गटात विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जाणारी आणि 16 वेळेसची ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेनाची या पराभवासह 34 सामन्यांत विजयी लय खंडित झाली. पाच वेळेसची चॅम्पियन सेरेना निर्णायक सेटमध्ये 4-2 ने पुढे होती. मात्र, यानंतर तिने लय गमावली आणि दोन तास व चार मिनिटांत तिचा पराभव झाला. 23 वी मानांकित लिसिकीने जबरदस्त प्रदर्शन करून सेरेनाविरुद्ध सामना आपल्या नावे केला.

अँडी मुरेची आगेकूच
लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन इंग्लंडच्या अँडी मुरेने पुरुष एकेरीतील अंतिम आठमध्ये धडक मारली. त्याने रशियाच्या मिखाईल योज्नीचा पराभव केला. अँडी मुरेने 6-4, 7-6, 6-1 अशा फरकाने सरळ तीन सेटमध्ये सामना जिंकला.


रोहन बोपन्ना-वॉसलिन अंतिम आठमध्ये दाखल
भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा फ्रान्सचा जोडीदार एडवर्ड रॉजर वॉसलिन यांनी ऑस्ट्रियाचा अँलेक्झांडर पेया आणि ब्राझीलच्या ब्रुनो सुआरेस या तिसर्‍या मानांकित जोडीला 6-4, 4-6, 7-6, 6-2 ने पराभूत करून पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या दोघांनी दोन तास आणि 17 मिनिटांत विजय मिळवला. बोपन्ना आणि वॉसलिन यांनी संपूर्ण सामन्यात 18 ऐस आणि 30 विनर मारले. या जोडीने 12 पैकी तीन ब्रेक पॉइंट घेतले.