आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wining Bronaz I Proved My Self Lalita Babar, Divya Marathi

अनुभवाचे बोल : सहा महिन्यांत कांस्य जिंकून केले स्वत:ला सिद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अवघ्या सहा महिन्यांच्या अल्पावधीत केलेल्या प्रचंड मेहनतीच्या बळावर मी आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावून स्वत:ला सिद्ध केले. या देदीप्यमान कामगिरीचा मला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया साता-याची युवा धावपटू ललिता बाबरने दिली.

या कांस्यपदकाने द्विगुणित झालेल्या आत्मविश्वासातून मी लवकरच रिओ ऑलिम्पिकचा प्रवेश निश्चित करेल, असा विश्वास ललिताने दैनिक ‘दिव्य मराठी’शी दुरध्वनीवरुन बोलताना व्यक्त केला.
तिने नुकत्याच दक्षिण कोरियात झालेल्या १७ व्या आशियाई स्पर्धेच्या तीन हजार मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक पटकावले. यापूर्वी ललिताने १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत नशीब आजमावले होते. मात्र, यातील अपयशानंतर तिने आपल्या इव्हेंटमध्ये बदल केला. मागील सहा महिन्यांपासून ललिताने तीन हजार मीटर स्टीपलचेसचा सराव सुरू केला होता.

दीड वर्षानंतर आई-वडिलांचे दर्शन
आशियाई स्पर्धेतील पदकाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली. यासाठी दीड वर्षापासून घराबाहेर राहिले. दक्षिण कोरिया, उटी आणि बंगळुऊ या ठिकाणी मी सातत्याने कसून सराव केला. त्यामुळे मला कांस्यपदकावर नाव कोरता आले. या यशानंतर मी आता घरी आली आहे. दीड वर्षानंतर मी आई-वडिलांची भेट घेतली. हा क्षणही माझ्यासाठी अधिक मोलाचा ठरला. घरातील सर्वच माझी आतुरतेने वाट पाहत होते, असेही ललिता म्हणाली.

झुणका-भाकरीचा लुटला आनंद
स्पर्धेनिमित्त मी विविध ठिकाणी जात असते. मात्र, मला घरच्या अन्नाची चव इतरत्र मिळत नाही. त्यानंतर घरी परतल्यावर आई स्वत:च्या हाताने केलेली झुणका-भाकरी मला देते. या वेळी तिने केलेल्या झुणका-भाकरीचा मी आनंद लुटला. तिच्या हाताला फार चव आहे, असे सांगताना ललिताच्या डाेळ्यात अश्रू तरळले होते. तिचे वडील शिवाजी बाबर हे शेतीचे काम करतात. तसेच तिची आईदेखील शेतीत मदत करते.