आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनी ऑलिम्पिक विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसे ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशांतर्गत निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असतानाच अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नवसंजीवनी मिळालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने निवडणुकांपूर्वीच महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी कंबर कसली आहे. गुरुवारी मंत्रालयात क्रीडामंत्री, क्रीडा संचालक, क्रीडा खात्याचे अधिकारी आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये पूर्वनियोजित तारखा आणि स्पर्धांची ठिकाणे यात काही बदल सुचवण्यात आले असल्याचे वृत्त आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 9 ते 16 फेब्रुवारी रोजी होणा-या या स्पर्धा आता महिन्याअखेरीस म्हणजे 21 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येतील. 5 कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक शासनाने याआधीच मंजूर केले आहे. तो सर्व निधी प्रत्यक्ष स्पर्धांचे आयोजन, विजेत्यांची पदके आणि प्रशस्तिपत्रके आदींसाठी वापरला जाईल.
त्याशिवाय सर्व विजेत्यांना रोख पुरस्कार स्वतंत्र निधी उभारून देता येतील का याचा विचार आयोजन समिती करीत आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धांच्या इतिहासात असे रोख पुरस्कार दिले गेल्यास तो नवा शिरस्त ठरेल. मात्र त्यासाठीचा निधी उभारण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनादेखील पुढाकार घेणार असल्याचे कळते.
या स्पर्धा एकूण 32 क्रीडा प्रकारांसाठी होतील. त्यापैकी सर्वाधिक 11 प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा पुण्यात बालेवाडी क्रीडा संकुलात होतील. महाराष्ट्राच्या 8 महसूल विभागांपैकी 7 विभागांत या स्पर्धा होणार आहेत. लातूर येथील क्रीडा संकुल अद्याप पूर्ण व्हायचे आहे. मुंबईत बॉक्सिंग व रग्बी या दोन खेळांच्या स्पर्धा होतील. त्यापैकी बॉक्सिंग हा खेळ जनमानसात पोहोचवण्यासाठी धारावी येथील क्रीडासंकुलाची निवड केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रग्बीच्या स्पर्धा बॉम्बे जिमखान्यावर होतील. नागपुरात 5, नाशिकमध्ये 5, औरंगाबादमध्ये 3 किंवा 4 तर कोल्हापूरमध्ये 4 व अमरावतीत 3 खेळांच्या स्पर्धा घेतल्या जाण्याची शक्यता आहे. यावर अधिक विचारविनिमय करण्यासाठी येत्या शनिवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक
मुंबई - बॉक्सिंग, टेबल टेनिस, हॉकी.
नागपूर - बास्केटबॉल, हॅँडबॉल, तलवारबाजी.
पुणे - अ‍ॅथलेटिक्स, जलतरण, कबड्डी, सायकलिंग, खो-खो, टेनिस रायफल शूटिंग, कुस्ती, वॉटरपोलो.
नाशिक - बॅडमिंटन, तायक्वांदो, स्क्वॅश, रग्बी, नेटबॉल.
औरंगाबाद - जिम्नॅस्टिक्स, व्हॉलीबॉल, सायकलिंग (रोड सायकलिंग, एमटीबी), सेपक टकरा.
कोल्हापूर - फुटबॉल, रोइंग, कनोईज, कमाकिंग ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग.
अमरावती - तिरंदाजी, ज्युदो, कराटे, आणि वुशू.
एकूण 32 क्रीडा प्रकारांसाठी या स्पर्धा होतील. लातूर येथील क्रीडा संकुल सज्ज नसल्यामुळे तेथे स्पर्धा आयोजित करता आल्या नाहीत.