आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Winning Target Before India, India Sri Lanka Third One Day Match Today

भारतला मालिका विजयाचे लक्ष्य, भारत-श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना आज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र - मैदानावर सरावादरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे.
हैदराबाद - भारत आणि श्रीलंकेदरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरी लढत रविवारी येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होईल. दुपारी १.३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. भारताने हा सामना जिंकला तर मालिका आपल्या नावे होईल. टीम इंडिया मालिकेत सध्या २-० ने पुढे आहे. दुसरीकडे, हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्यासाठी श्रीलंकेचा संघ खेळेल.

धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण दमदार होत आहे. कोहलीने नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनीची उणीव जाणवू दिली नाही. कोहलीने चतुराईने नेतृत्व करताना गोलंदाजांचा योग्यपणे वापर केला. शिवाय फलंदाजांतही आत्मविश्वास निर्माण करण्यात यश मिळवले.

फलंदाजी जबरदस्त
कटक वनडेत दोन्ही सलामीवीर शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांनी शतके ठोकली होती, तर अहमदाबाद येथे अंबाती रायडूची बॅट तळपली आणि त्याने शतक ठोकले. रायडूचे हे कारकीर्दीतील पहिले वनडे शतक ठरले. दुस-या लढतीत शिखर धवनने अर्धशतक ठोकून आपला फॉर्म कायम ठेवला.

भारतीय गोलंदाजी तुल्यबळ
भारतीय गोलंदाजांनीसुद्धा दोन सामन्यांत चांगली गोलंदाजी केली. पहिल्या वनडेत ईशांत शर्माने ४ विकेट घेतल्या. दुस-या सामन्यात फिरकीपटू आर. अश्विन आणि अक्षर पटेल यांनी चमक दाखवली. युवा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने दुस-या सामन्यात १० षटकांत ३९ धावांच्या मोबदल्यात २ गडी बाद केले. यामुळे कोहली तिस-या लढतीसाठी भारतीय संघात जास्त बदल करेल, असे वाटत नाही.

श्रीलंकाही आहे सज्ज
सलग दोन सामन्यांतील पराभवानंतर तिस-या लढतीत विजय मिळवून मालिकेत पुनरागमनासाठी श्रीलंकेची टीम सज्ज झाली आहे. तिस-या सामन्यात जोरदार प्रत्युत्तर देण्याची श्रीलंकेची तयारी आहे. मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी श्रीलंकेला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. अँग्लो मॅथ्यूजच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने अहमदाबाद येथे चांगली कामगिरी केली होती. सुरुवातीला लवकर विकेट पडल्यानंतरसुद्धा मॅथ्यूजच्या नाबाद ९२ धावा आणि अनुभवी कुमार संगकाराच्या ६१ धावांच्या बळावर श्रीलंकेने चांगला स्कोअर उभा केला. जयवर्धनेच्या फॉर्मची लंकेला मात्र चिंता आहे.

दोन्ही संभाव्य संघ
भारत
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायडू, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, धवल कुलकर्णी, उमेश यादव, ईशांत शर्मा, अमित मिश्रा, मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल.
श्रीलंका
अँग्लो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, तिलकरत्ने दिलशान, उपुल थरंगा, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, अशान प्रियंजन, निरोशन डिकवेला, तिसरा परेरा, नुवान कुलशेखरा, धम्मिका प्रसाद, लाहिरू गमागे, चतुरंगा डिसिल्व्हा, सिकुगे प्रसन्ना,
सूरज रणदिव.

टॉस असेल निर्णायक
तिस-या वनडेत टॉस निर्णायक भूमिका बजावेल. टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. नंतर गोलंदाजांना दवबिंदूची अडचण येण्याची शक्यता आहे.

वर्ल्डकप लक्षात ठेवून योजना
आगामी वनडे वर्ल्डकप लक्षात ठेवून आम्ही योजना तयार करत आहोत. यात आम्ही चांगले यशस्वी ठरलो आहोत. आम्ही २-० ने पुढे आहोत, याकडे माझे लक्ष नाही. आमचे लक्ष्य फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आहे.
-विराट कोहली, कर्णधार, टीम इंडिया.

गोलंदाजी चिंताजनक
श्रीलंकेसाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांची दुबळी गोलंदाजी आहे. धम्मिका प्रसाद, परेरा आणि सूरज रणदिव यांना मालिकेत अद्याप आपल्या लौकिकानुसार कामगिरी करता आलेली नाही. ऑफस्पिनर सूरज रणदिवने पहिल्या लढतीत ३ विकेट घेतल्या, मात्र दुस-या सामन्यात लेगस्पिनर सिकुगे प्रसन्नानेसुद्धा तीन गडी बाद केले. हे दोन्ही फिरकीपटू भारतापुढे प्रचंड महागडे ठरले.