आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women World Cup : With Defeat Srilanka India Out World Cup

श्रीलंकेचा 138 धावांनी विजय; भारत महिला विश्‍वचषक स्पर्धेतून आऊट!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गोलंदाजांच्या गचाळ कामगिरीनंतर फलंदाजांच्या अपयशामुळे भारतीय महिला संघाला वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरुद्ध 138 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह वुमन इंडिया टीम वर्ल्डकपबाहेर झाली. श्रीलंकेकडून दीपिका रसंगिका (84), यशोदा मेंडिस (55), कर्णधार शशिकला श्रीवर्धने (59), इशानी कौशल्या (नाबाद 56) यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर श्रीलंकेने 5 बाद 282 धावा ठोकून भारतासमोर विजयासाठी कठीण लक्ष्य दिले. भारताचा डाव 144 धावांत आटोपला. अ गटातून भारत तर ब गटातून पाकिस्तान महिला संघही वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे.

श्रीलंकेच्या अव्वल पाचपैकी चार फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाहुण्या संघाने पहिल्या षटकात चामरी अट्टापटूची (4) विकेट गमावली. झुलनच्या गोलंदाजीवर मिताली राजने तिचा झेल घेतला. यानंतर श्रीलंकेकडून मेंडिस आणि रसंगिका यांनी दुस-या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी करून डाव सावरला. रसंगिकाने श्रीवर्धनेसोबत तिस-या विकेटसाठी 67 धावा जोडल्या. मेंडिसने 80 चेंडूंचा सामना करताना 8 चौकारांसह 55 धावा काढल्या. अमित शर्माने तिला बाद केले. रसंगिकाने 109 चेंडूंत 11 चौकारांसह 84 धावा जोडल्या. झुलन गोस्वामीनेच तिला बाद केले. कर्णधार श्रीवर्धनेने 67 चेंडूंत 6 चौकार मारताना 59 धावांची नेत्रदीपक खेळी केली. श्रीलंकेचा रनरेट वाढवला तो कौशल्याच्या आक्रमक फलंदाजीने. कौशल्याने अवघ्या 31 चेंडूंत 3 षटकार आणि 6 चौकार ठोकून नाबाद 56 धावा कुटल्या.

भारताच्या फक्त 144 धावा
विजयासाठी आवश्यक असलेल्या 283 धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाचा डाव 42.2 षटकांत सर्वबाद 144 धावांत आटोपला. रीमा मल्होत्राने सर्वाधिक 38 धावा काढल्या. श्रीलंकेविरुद्ध भारताची गचाळ सुरुवात झाली. सलामीवीर पूनम राऊत अवघ्या 5 धावांवर बाद झाली. कामिनी (22) आणि कर्णधार मिताली राज (20) यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघीही बाद झाल्यानंतर मधल्या फळीवर दबाव निर्माण झाला. मागच्या सामन्यातील शतकवीर खेळाडू हरमनप्रीत कौर शून्यावरच बाद झाली. तर कारू जैन अवघ्या 8 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतली. श्रीलंकेकडून सेनेविरत्ना, श्रीवर्धने यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.