आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठांची महिला फुटबॉलला आडकाठी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आगामी काळात राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी जाहीर केलेल्या धोरणालाच हरताळ फासला जात आहे. तब्बल 15 विद्यापीठांनी राज्यातील महिला फुटबॉलच्या विकासास आडकाठी लावली आहे. या विद्यापीठाच्या निरुत्साही धोरणामुळेच सध्या राज्यातील 558 युवा महिला खेळाडूंचे करिअर धोक्यात आले आहे. या सर्वच विद्यापीठांतील क्रीडा विभागांना महिलांच्या फुटबॉलचे वावडे असल्याचे चित्र आहे. क्रीडा विभाग महिला फुटबॉल संघ तयार करून विद्यापीठस्तरीय स्पर्धेत पाठवण्यास अनुत्सुक आहेत. त्यामुळे विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयांतील अनेक युवा महिला खेळाडूंचे करिअर अडचणीत आले आहे. मात्र, याच क्रीडा विभागाकडून दरवर्षी विद्यापीठस्तरीय स्पर्धेत पुरुषांचा फुटबॉल संघ पाठवला जातो.

साडेपाचशे खेळाडूंचे करिअर धोक्यात
विद्यापीठातील क्रीडा विभागाच्या दिरंगाईचा मोठा फटका राज्याच्या 31 जिल्ह्यांतील युवा महिला फुटबॉलपटूंना बसत आहे. या सर्वांची संख्या 558 एवढी आहे. दरवर्षी 19 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या 18 महिला खेळाडूंची निवड केली जाते. त्यानंतर आठ विभागांतील 18 खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरतात. यातूनच राज्याचा 18 सदस्यीय संघ तयार केला जातो. या सर्व महिला खेळाडू 19 वर्षांखालील दरवर्षी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सहभागी होतात.

खेळाडू नसल्याचा विद्यापीठांचा कांगावा
दरवर्षीय साडेपाचशेपेक्षा अधिक महिला खेळाडू तयार होतात. तरीही विद्यापीठ खेळाडू नसल्याचा कांगावा करत आहे. सदर सबब समोर करून राज्यातील 15 विद्यापीठांनी महिलांचा फुटबॉल संघ पाठवण्यास नापसंती दशर्वली आहे.

दरवर्षी 10 राष्ट्रीय खेळाडूंचा बळी
वर्षाकाठी 10 राष्ट्रीय महिला फुटबॉलपटूंचा बळी जात आहे. या सर्व खेळाडूंना विद्यापीठस्तरीय स्पर्धेत सहभागी होता येत नाही.

नागपूर, पुणे विद्यापीठांचा पाठिंबा
नागपूरसह पुणे, मुंबई आणि कोल्हापूर विद्यापीठाच्या वतीने सातत्याने महिला फुटबॉल संघ स्पर्धेसाठी पाठवला जातो.
निरुत्साही विद्यापीठ
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणारे
3. स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ, नांदेड
4. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
5. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
6. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
7. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
8. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
9. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
10. पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
11. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
12. संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती
13. सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
14. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली
15. एसएनडीटी, मुंबई

(फोटो - संग्रहित छायाचित्र)