आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Badminton Championship: Shindu Made History, Medal Fix

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप: सिंधू उपान्त्य फेरीत प्रवेश , पदक निश्चित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वांगझू - भारताची नवोदित खेळाडू पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी केली. तिने सुरेख विजय साकारताना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला. तिने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित शिजियान वांगला पराभूत केले. तिने 55 मिनिटांत 21-18, 21-17 अशा फरकाने सामना जिंकला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये प्रथमच खेळणार्‍या सिंधूने विजयासह आपले पदक निश्चित केले. दुसरीकडे भारताची सायना व पी. कश्यपचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

सिंधू : चौथी भारतीय खेळाडू
कोपेनहेगन येथे 1983 मध्ये प्रकाश पदुकोनने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. भारताचे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील हे पहिले पदक होते. त्यानंतर दुहेरीत ज्वाला व अश्विनीने कांस्यपदक मिळवले होते. या स्पर्धेत पदक निश्चित करणारी सिंधू ही चौथी भारतीय खेळाडू ठरली.

दहाव्या मानांकित सिंधूला पहिल्या फेरीत पुढे चाल (बाय) मिळाली होती. तिने दुसर्‍या फेरीत जपानच्या काओरी इमाबेप्पुला पराभूत केले. त्यानंतर तिने प्री क्वार्टर फायनलमध्ये दुसर्‍या मानांकित आणि गतविजेत्या यिहान वांगला हरवून सर्वात मोठा विजय निश्चित केला. हैदराबादची ज्युनियर आशियाई चॅम्पियन सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत पुन्हा एकदा चीनच्या वांगला 55 मिनिटांत धूळ चारली.

शेवटपर्यंत सिंधूचा दबदबा
सिंधूने पूर्ण लढतीदरम्यान वांगविरुद्ध सुरेख कामगिरी केली. तिने सामन्यावरची पकड कधीही कमी होऊ दिली नाही. तिने सामन्यात नऊ स्मॅश विनर, आठ नेट विनर आणि 19 क्लीयर विनर मारले.

पहिल्या गेममधील आघाडी कायम : पहिल्या गेममध्ये भारताच्या सिंधूने तिसर्‍या गुणानंतर घेतलेली आघाडी कायम ठेवली. तिने 6-3, 10-5, 13-8, 16-12 आणि 19-15 ने आघाडी मिळवत 21-18 ने पहिला गेम जिंकला.

दुसरा गेम : सिंधूने दुसर्‍या गेममध्येही आपला दबदबा कायम ठेवला. तिने सलग पाच गुणांची कमाई करताना 6-2 ने आघाडी घेतली. दरम्यान, वांगने 6-6 ने बरोबरी साधली. मात्र, सिंधूने सलग तीन गुणांची कमाई करून आघाडी घेतली. त्यानंतर तिने आघाडीचा सिलसिला अबाधित ठेवत 21-17 सामना आपल्या नावे केला.

40 मिनिटांत सायना पराभूत
भारताच्या सायनाने सर्वांची निराशा केली. तिला 13 व्या मानांकित यिओन जू बेईने पराभूत केले. कोरियाच्या बेईने 40 मिनिटांत भारताच्या खेळाडूला धूळ चारली. तिने 23-21, 21-9 ने सामना जिंकला. सायनाने यिओन बेइविरुद्ध 11 स्मॅश विनर मारले.

पहिला गेम : सायनाने 6-2 त्यानंतर 14-7 ने आघाडी घेतली होती. बेईने 19-19 ने बरोबरी साधली. त्यानंतर दोघींनी 21-21 ने बरोबरी मिळवली. दोन गुणांची कमाई करून बेईने पहिला गेम आपल्या नावे केला.

दुसरा गेम : सायनाने 3-1 ने आघाडीनंतर निराशाजनक खेळी केली. याचा फायदा घेत कोरियाच्या खेळाडूने 14-9 ने आघाडी मिळवली. त्यानंतर सलग सात गुण मिळवून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.


कश्यपची झुंज अपयशी
पहिला गेम : पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये शर्थीची झुंज रंगली. मात्र, कश्यपने 21-16 ने पहिला गेम जिंकला.
दुसरा गेम : पेंगयूने 7-0 ने एकतर्फी आघाडी घेतली. त्याने 19-20 नंतर तीन गुण मिळवून 22-20 ने गेम जिंकला.
तिसरा गेम : निर्णायक गेममध्ये कश्यपने 12-8 ने आघाडी घेतली होती. मात्र, चीनच्या खेळाडूने सलग आठ गुण मिळवून 16-12 ने आघाडी घेतली. आघाडी कायम ठेवत पेंगयूने 21-15 ने विजय मिळवला.