आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा: जयराम, कश्यपची आगेकूच सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वांगझू - भारताचा स्टार खेळाडू अजय जयराम आणि पी. कश्यप यांनी जागतिक बॅडमिंटन स्पध्रेत विजयी प्रारंभ केला. जयरामने पुरुष एकेरीच्या आपल्या पहिल्या लढतीत जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानी असलेल्या हाँगकॉँगच्या विंग की वांगचा पराभव केला. त्याने 64 मिनिटांत 22-20, 17-21, 21-15 अशा फरकाने सामना जिंकला. दुसरीकडे 13 वा मानांकित कश्यपने पहिला गेम गमावल्यानंतर पराभवाच्या उंबरठय़ावरुन जोरदार पुनरागमन करताना एस्टोनियाच्या राऊट मस्टला 19-21, 21-14, 21-9 ने पराभूत केले.

लंडन ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल व जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या पी.व्ही. सिंधूला पहिल्या फेरीत पुढे चाल (बाय) मिळाली आहे. भारताच्या या दोन्ही महिला खेळाडू मंगळवारपासून आपल्या विजयी मोहिमेला प्रारंभ करतील.

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताच्या चार जोड्यांना सलामीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यामध्ये मिर्श दुहेरीत अरुण विष्णू व अपर्णा बालनचा पराभव झाला. मिन चुन-ओसियाओ हुआन चेनने भारताच्या जोडीला 21-16, 21-16 ने पराभूत केले. अवघ्या 25 मिनिटांत भारताच्या जोडीचे आव्हान संपुष्टात आले.

तरुण कोना व अश्विनी पोनप्पाला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. हिरोकात्सू हाशिमोता-मियुकी माएदाने 21-18, 12-21, 21-19 अशा फरकाने सामना जिंकला. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अश्विनी पोनप्पा व अपर्णा बालनला दोन वेळा पराभवाला सामोरे जावे लागले. दोघीही मिर्श दुहेरीत पराभूत झाल्या.