मुंबई - आगामी २०१५ च्या विश्वचषक क्रिकेटचा ज्वर आतापासून पसरायला लागला. स्पर्धेला १०० दिवस शिल्लक असताना जगातील विविध संघांच्या कर्णधारांनी उत्सुकता बोलून दाखविली. यजमान ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार मायकल क्लार्क म्हणाला, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याची संधी या विश्वचषकात आम्हाला मिळत आहे, ही आगळीवेगळी गोष्ट आहे. जेव्हा १४ फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध सलामीची लढत खेळण्यासाठी आम्ही मेलबोर्न क्रिकेट ग्राऊंडवर प्रवेश करू, त्यावेळचे वातावरण रोमांचकारी असेल.
विश्वचषक हे सर्वोच्च यश : महेंद्र सिंग धोनी
विश्वचषक विजेतेपद ही क्रिकेटमधील सर्वोच्च मिळकत आहे. ती मिळकत ऑस्ट्रेलियात
आपल्याकडेच कायम ठेवणे यासारखी दुसरी आव्हानात्मक संधीच नाही,असेही भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले. विश्वचषक कायम राखण्याच्या भारताच्या मोहिमेला, १५ फेब्रुवारीपासून आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्याविरुद्ध अॅडिलेड येथील लढतीने सुरुवात होत आहे.
भारतविरुद्ध लढत महत्त्वाची : मिसबाह
‘भारताविरुद्ध सलामीची लढत महत्त्वाची आहे. एवढेच नव्हे, तर स्पर्धेतील प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. १९९२ मधील विश्वविजेतेपद आम्हाला चांगल्या कामगिरीची प्रेरणा देत राहील,असे पाकचा कर्णधार मिसबाह म्हणाला.
कटू आठवणी पुसणार : मॅथ्यूज
गत २०११ च्या वर्ल्डकपच्या फायनलमधील पराभवाच्या कटू आठवणी विसरता येणार नाहीत. दुखापतीमुळे मला अंतिम फेरीत खेळता आले नव्हते, हे दु:खही मला हलके करायचे आहे, असे श्रीलंकेचा कर्णधार मॅथ्युजने सांगितले.
जेतेपदाच्या इराद्याने खेळणार : कूक
‘ उत्तम कामगिरी करून इंग्लंडला जेतेपद देण्याच्या उद्देशाने आम्ही स्पर्धेत उतरणार आहोत. प्रत्येक क्रिकेटपटूचे विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न असते, असे कर्णधार इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूक म्हणाला.
स्वप्न साकारणार : डिव्हिलर्स
‘आमच्या संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे या वेळी विश्वचषकात उत्तम कामगिरी करू, असा विश्वास आहे. या क्रिकेट परिस्थितीशी मिळतीजुळती आहे, असे आफ्रिकेचा कर्णधार ए. बी. डिव्हिलर्स म्हणाला.
पूर्ण तयारीनिशी सज्ज : बेन्डॉन
ख्राइस्ट चर्च येथे माजी विजेत्या श्रीलंका संघाविरुद्ध दोन हात करताना आपल्या संघाला पूर्ण ताकदीनिशी व तयारीनिशी उतरावे लागणार आहे, असे न्यूझीलंडचा कर्णधार बेन्डॉन म्हणाला.
विजयासाठी प्रयत्नशील राहणार : मुर्तुझा
‘या स्पर्धेत या आधी मिळविलेले दिग्गज संघाविरुद्धचे विजय आम्हाला कायम स्फूर्ती देत राहतील, असे बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मुर्तुझा म्हणाला.
49 सामने
02 गट
14 मैदाने
14 एकूण संघ