आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015: All Eyes On Australia England Match, Today Two Games

वर्ल्ड कप: ऑस्ट्रेलिया-इंग्लंड लढतीवर सर्वांचे लक्ष, आज होणार दोन सामने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव करताना इंग्लंडचा कर्णधार मोर्गन.
मेलबर्न/ख्राइस्टचर्च - व्हॅलेंटाइन डेलाच न्यूझीलंड-श्रीलंका यांच्यातील लढतीने विश्वचषकाला सुरुवात होत आहे. मात्र, जगभरातील चाहत्यांच्या नजरा मेलबर्नवर होणा-या ऑस्ट्रेलिया-इंग्लंड लढतीवर असतील. या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना पाहण्यासाठी ९० हजार चाहते स्टेडियमवर असतील.

विश्वचषक विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलिया प्रबळ दावेदार आहे. मागच्या १२ सामन्यांत फक्त एक सामना त्यांनी गमावला. चार वेळेसच्या चॅम्पियन संघाने गेल्या काही दिवसांपूर्वीच तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये इंग्लंडला हरवले होते. कांगारूंची फलंदाजांची फळी मजबूत आहे. शिवाय जॉन्सन, स्टार्क, कमिन्स असे खतरनाक वेगवान गोलंदाज भात्यात आहेत. याचाच अर्थ असा की इंग्लंडचा मार्ग सुकर नाही. इंग्लंडची फलंदाजी सातत्यपूर्ण लयीत नसते. मात्र, त्यांची गोलंदाजी तगडी आहे. अँडरसन, स्टीव्हन फिन, ब्रॉड, ट्रेडवेल, मोईन अली असे अनुभवी आणि शानदार गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. यांच्या कामगिरीवरच इंग्लंडचा विजय अवलंबून असेल.

क्लार्क खेळणार नाही
नियमित कर्णधार मायकेल क्लार्क फिट झालेला नाही. यामुळे तो इंग्लंडविरुद्ध खेळू शकणार नाही, असे जॉर्ज बेलीने सांगितले. तरीही कांगांरूना क्लार्कची उणीव जाणवणार नाही.
ऑस्ट्रेलिया (संभाव्य ११) : जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अॅरोन फिंच, शेन वॉटसन, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श, ब्रेड हॅडिन, मिशेल जॉन्सन, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड.

इंग्लंड (संभाव्य ११) : इयान मोर्गन (कर्णधार), इयान बेल, मोइन अली, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, रवी बोपारा, जोस बटलर, क्रिस वोग्स, स्टुअर्ट ब्रॉड, स्टीव्हन फिन, जेम्स अँडरसन.
स्टार टू वॉच : अँडरसन आणि वॉर्नर

वॉर्नरला आम्ही डिवचणारच : अँडरसन
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन म्हणाला, 'डेव्हिड वॉर्नर लवकर उत्तेजित होतो. काही कारणाने असे झाले तर आम्हाला काहीच अडचण नाही. आम्ही अशी कोणतीच संधी सोडणार नाही. मात्र, आमचे मुख्य कार्य विकेट घेण्याचे आहे आणि आम्ही यावरच लक्ष केंद्रित करणार. मेलबर्नच्या मैदानावर ९० हजार कांगारूंचा सामना करण्यात मजा येईल. मी या लढतीसाठी खूप आतुर आहे.'

यंदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३०० धावा होतील काय?
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये कोणालाही ३०० धावा काढता आलेल्या नाहीत. हा रेकॉर्ड या वर्ल्डकपमध्ये कोणी मोडेल काय?