आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कप जिंकला ‘कांगारूं’नी; मने ‘किवीं’नी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - इंग्रज जगात जिथं-जिथं गेले तिथं क्रिकेट रुजलं. म्हणूनच फुटबॉलच्या तुलनेत क्रिकेटचं विश्व फारच तोकडं आहे. भारताप्रमाणेच कधीकाळी युनियन जॅकच्या अधिपत्याखाली नांदणारे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यंदाच्या एकदिवसीय वर्ल्डकपचे आयोजक होते. हे दोन्ही देश इंग्लंडच्या राणीपुढे मान तुकवणारे. त्यांची भाषा एक. ध्वजातील चांदण्यांची संख्या आणि रंग यातला फरक सोडला तर या दोघांचे राष्ट्रध्वजसुद्धा एकसारखेच. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडला धाकटा ‘ब्रो’ मानते. सुमारे साडेतीन तासांच्या हवाई अंतरावर असलेल्या या दोन्ही देशांमध्ये टास्मान समुद्र नसता तर या दोघांचं स्वतंत्र अस्तित्वही उरलं नसतं. या दोन्ही देशांत वैर नाही. खेळाच्या मैदानावर मात्र कमालीची चुरस असते.

विक्रमी पाचव्यांदा विश्वविजेते ठरल्यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना "विनर ठरलात पण चॅम्पियन नाही,' अशा शेलक्या ‘ऑसी’ टीकेला सामोरे जावे लागले, तर न्यूझीलंडच्या खेळाडूंचे वेलिंग्टनमध्ये ‘हीरो’ म्हणून उत्स्फूर्त स्वागत झाले. न्यूझीलंडने संपूर्ण स्पर्धेत सभ्यता आणि खेळाप्रती आदरभाव दाखवला.

न्यूझीलंडचे कौतुक
पाचव्यांदा जगज्जेते ठरल्यावरही खुद्द ऑस्ट्रेलियात क्रिकेटचा उन्माद वगैरे काहीच जाणवत नाही. इंग्लंडविरुद्धच्या ‘अ‍ॅशेस’ कसोटी मालिकेच्या तयारीला ते लागलेत. फार कमी वेळेत एकदिवसीय यश त्यांनी मागे टाकलेय. स्थानिक मीडियानेही विजयी कामगिरीवर स्तुतिसुमने उधळण्यापेक्षा न्यूझीलंडच्या संयमी वृत्तीचं कौतुक जास्त केलंय. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या वर्तनावर टीका केलीय.

निरोपाची निराशा
दर चार वर्षांनी येणारा वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटू पाहतो. कारकीर्दीत एखाददुसरा वर्ल्डकप खेळायला मिळाला तरी ती फार मोठी गोष्ट समजावी, इतकी स्पर्धात्मकता आज आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क मोठा नशीबवान. पाँटिंगच्या नेतृत्वाखालील विश्वविजेत्या संघात तो होता आणि त्याच्या नेतृत्वाखालीही त्याने वर्ल्डकप जिंकला. संगकारा, जयवर्धने, मलिंगा या श्रीलंकेच्या मोठ्या खेळाडूंना हे भाग्य लाभले नाही. व्हिट्टोरीला किमान फायनल खेळण्याचे समाधन होते.