आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्‍वचषक: गुप्तिल विंडीजला वरचढ, न्यूझीलंडची वेस्ट इंडीजवर १४३ धावांनी मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेलिंग्टन - मार्टिन गुप्तिलने तुफानी द्विशतक ठोकून चौथी क्वार्टर फायनल एकतर्फी केली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या किवी संघाने ३९३ धावांचा डोंगर उभा केला. नंतर ट्रेंट बोल्टच्या (४/४४) नेतृत्वात शानदार गोलंदाजी करताना वेस्ट इंडीजला अवघ्या ३०.३ षटकांत २५० धावांत गुंडाळले. न्यूझीलंडने हा सामना १४३ धावांनी जिंकला. न्यूझीलंडने तब्बल
सातव्यांदा सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. किवी टीम आता २४ मार्च रोजी ऑकलंड येथे होणा-या सेमीफायनलमध्ये बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी लढेल.

क्वार्टर फायनलमध्ये न्यूझीलंडची सुरुवात सरळ झाली. पहिल्या १० षटकांत त्यांचा स्कोअर १ बाद ६३ धावा होता. कर्णधार ब्रेंडन मॅक्लुम (१२) मोठी खेळी करू शकला नाही. गुप्तिलने (२३७*, १६३ चेंडू, २४ चौकार, ११ षटकार) दुस-या विकेटसाठी केन विलियम्सनसोबत ६२, तर तिस-या विकेटसाठी रॉस टेलरसोबत १४३ धावांची भागीदारी करून मोठ्या स्कोअरचा पाया रचला.

अखेरच्या षटकांत गुप्तिल बरसला : गुप्तिलने सुरुवातीच्या ११७ धावा काढण्यासाठी १२० चेंडू खेळले. यानंतरच्या ४३ चेंडूंत त्याने १२० धावा ठोकल्या. एलियटने ११ चेंडूंत २७ धावा काढल्या.
गेल एकटाच लढला
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजने वेगवान सुरुवात केली. मात्र, दुस-या टोकाने त्यांच्या विकेट ठरावीक अंतराने पडत होत्या. गेलने ३३ चेंडंूत ६१ धावा काढल्या. यात ८ षटकार ठोकले. कर्णधार होल्डरने ४२ धावांचे योगदान दिले. उर्वरित फलंदाज मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झाले. किवी संघाकडून ट्रेंट बोल्टशिवाय टीम साऊथी आणि
डॅनियल व्हिट्टोरी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. मात्र, सामना गाजवला तो गुप्तिलच्या खेळीनेच.
६०.५ टक्के धावा गुप्तिलने आपल्या संघाकडून काढल्या. वनडेत १० फलंदाजांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक धावा काढल्या आहेत.
३५ बाउंड्री गुप्तिलने (२४ चौकार, ११ षटकार) मारल्या. रोहित शर्माने लंकेविरुद्ध ४२ बाउंड्रीज (३३ चौकार, ९ षटकार) मारल्या होत्या.
व्हिट्टोरीचा थरारक झेल
सामन्यात दोन झेल असे झाले, ज्यांची चर्चा वर्ल्डकपनंतरही होईल. पहिले म्हणजे, गुप्तिलचा सॅम्युअल्सने सोडलेला झेल. गुप्तिलने यानंतर वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठी खेळी केली. दुसरे म्हणजे, डीप पॉइंट बाउंड्रीवर व्हिट्टोरीने सॅम्युअल्सचा घेतलेला (फोटो) थरारक झेल. व्हिट्टोरीने उडी मारून "ब्लाइंडर झेल' घेतला तेव्हा त्याला चेंडूसुद्धा दिसत नव्हता.
'टू टोज'ची कमाल !
डाव्या पायास एक बोट, अंगठा असल्यामुळे 'टू टोज' नावाने ओळखल्या जाणा-या गुप्तिलने द्विशतकात ९५ धावा धावून काढल्या. तो १३ वर्षांचा असताना एका दुर्घटनेत तीन बोटे कापली गेली. तत्कालीन कर्णधार फ्लेमिंग रुग्णालयात जाऊन त्याला म्हणाला, 'एक दिवस तू सात बोटांवर धावून सीनियर क्रिकेटमध्ये कमाल करशील.'
०२ द्विशतके वेस्ट इंडीजविरुद्ध झळकली आहेत. कोणत्याही संघाविरुद्ध सर्वाधिक. २०११ मध्ये सेहवागने वेस्ट इंडीजविरुद्ध द्विशतक केले होते.

९६ धावा रसेलने दिल्या. नॉकआऊटमध्ये कोणत्याही गोलंदाजाची ही सुमार कामगिरी.
भारताच्या श्रीनाथने २००३ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये ८७ धावा दिल्या होत्या.
सेमीफायनल लाइनअप निश्चित
फायनलला ऑस्ट्रेलिया, भारतच फेव्हरेट
सेमीफायनलची लाइनअप निश्चित झाली आहे. फायनल कोणत्या संघांत होईल व कोण असेल किताबाचा दावेदार, याची उत्सुकता आहे. यासाठी चार दावेदार आहेत. फॉर्म, फिटनेस, रेकॉर्ड आणि परिस्थितीचा विचार केल्यास दुस-या उपांत्य सामन्यातील (भारत -ऑस्ट्रेलिया) विजेती टीमच विश्वचषकाची मानकरी ठरेल. जाणून घ्या का?

भारत : सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले तर कधीही सेमीफायनल न गमावणा-या संघाला हरवण्याचा फायदा होईल. शिवाय सलग आठ विजय. गतविजेते असल्याचा रुबाब आहेच. फायनल मेलबर्नला होईल. येथेच भारताने आफ्रिकेला दणका दिला होता.

ऑस्ट्रेलिया : अशा संघाला हरवण्याचा फायदा मिळेल, जी टीम उपांत्य फेरीपर्यंत अजेय होती. गतचॅम्पियन होती. टीम फॉर्मात तर आहेच, यजमान होण्याचाही फायदा मिळेल. सेमी आणि फायनल कधीही न हरण्याचा इतिहास प्रेरणादायी ठरेल.

न्यूझीलंड : फायनलमध्ये दोन गोष्टी न्यूझीलंडविरुद्ध जाऊ शकतात. या वर्ल्डकपमध्ये प्रथमच देशाबाहेर खेळतील. त्यांना मेलबर्नचे मोठे मैदान मिळेल, अशी खेळपट्टी जेथे न्यूझीलंडसारखे चेंडू स्विंग होत नाही. त्यांनी कधीही भारत आणि ऑस्ट्रेलियाला नॉकआऊटमध्ये हरवले नाही. या विक्रमाचा आणि विश्वचषक पहिल्यांदा जिंकण्याचा दबाव न्यूझीलंडवर असेल.
दक्षिण आफ्रिका : न्यूझीलंडला पराभूत केल्यास अाफ्रिका असा संघ ठरेल, ज्याने दोन साखळी सामने गमावल्यानंतर फायनल गाठले. अर्थात कामगिरीत सातत्य नाही. जेथे (मेलबर्न) फायनल होईल, त्याच ठिकाणी भारताने एक महिन्याआधी त्यांना हरवले आहे. चोकर्सचा ठपका तर आहेच. तो पुसण्याचा दबाव असेलच.