आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्वचषक हॉकी स्पर्धेत पदक मिळून देणा-या महिला संघाचे मायभूमीत जल्लोषात स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विश्वचषक हॉकी स्पर्धेत पहिल्यांदा पदक जिंकणा-या भारतीय ज्युनिअर महिला संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंगळवारी सकाळी इंदिरा गांधी आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर संघाचे आगमन झाल्यावर चाहत्यांनी ढोल-ताशांच्या आवाजात खेळाडूंचे स्वागत केले. या संघांतील खेळाडूंचा जयजयकार करण्यात आला.
भारतीय संघाने जर्मनीतील विश्वचषक हॉकी स्पर्धेत इंग्लंडला पराभूत करून कांस्यपदक जिंकले. भारतीय संघाचे मंगळवारी मायदेशी आगमन झाले. याप्रसंगी हॉकी इंडिया व साईचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी कर्णधार सुशीला चानू म्हणाली की, ‘आम्ही फार खुश आहोत. संघाने मोठे यश मिळवले आहे. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात आमच्यावर फार दबाव होता. मात्र, सांघिक खेळी करून आम्ही नेत्रदीपक यश संपादन करून नवा इतिहास रचला. ही कामगिरी आगामी विश्वचषक स्पर्धेतही करणार आहेत.


या ऐतिहासिक कामगिरीमुळे संघातील प्रत्येक खेळाडूला स्वत:चा अभिमान आहे. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात थोडे दडपण होते. मात्र, संघातील खेळाडूंनी पदक जिंकण्याचा संकल्प केला होता. विश्वचषक स्पर्धेत भारताची राणी रामपालला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिने स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. तिने स्पर्धेत सर्वाधिक 6 गोल केले.


04 विजय भारताचे
06 गोल केले राणीने


भारतीय संघाची कामगिरी
निकाल विरुद्ध संघ गोल
पराभूत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 1-6
विजयी विरुद्ध रशिया 10-1
विजयी विरुद्ध न्यूझीलंड 2-0
विजयी विरुद्ध स्पेन 4-2
पराभूत विरुद्ध हॉलंड 3-0
विजयी विरुद्ध इंग्लंड 4-3


अन्..‘चक दे इंडिया’तील शाहरुखचे भाषण आठवले : राणी
‘भारतीय हॉकी अद्याप जिवंत आहे. माझ्या करिअरमध्ये भारताचा हा मोठा विजय ठरला. या कामगिरीमुळे भारतीय संघ आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. आता जगातील कोणत्याही बलाढ्य संघाला पराभूत करू शकतो, असा विश्वास निर्माण झाला आहे. तिस-या स्थानासाठी होणा-या सामन्यापूर्वी आम्ही सर्वांनी चर्चा केली. 70 मिनिटे हे आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे क्षण आहेत, असे ‘चक दे इंडिया’ चित्रपटात शाहरुख खानने केलेले भाषण आम्हाला आठवले. याच भाषणाने आम्हाला प्रेरणा मिळाली,’ अशी प्रतिक्रिया राणी रामपालने दिली.


राणी रामपालचा संघर्ष कौतुकास्पद : बलदेव
‘भारतीय संघातील राणी रामपाल ही जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. ती सामन्यात फार वेगाने धावते. यासह तिच्यात वेगाने चेंडूवर नियंत्रण मिळवण्याची कला आहे. विशेष म्हणजे, सामन्यात राणी ही शेवटच्या सेकंदापर्यंत संघाच्या विजयासाठी संघर्ष करते,’ असे मत द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक बलदेव सिंग यांनी मांडले. बलदेव सिंगच्या मार्गदर्शनाखाली राणी खेळते.