आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Number One Victoria Azarenka Loses In French Open

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच ओपनः नंबर वन अझारेंकाचा पराभव; जोकोविच, फेडरर चौथ्‍या फेरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- फ्रेंच ओपनमध्ये रविवारी सर्वांत मोठा धक्कादायक निकाल लागला. जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेल्या बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाला पराभवाचा सामना करावा लागला. तिला 15 वी मानांकित डॉमिनिका सिबुलकोवाने पराभूत करून स्पर्धेबाहेर केले. पुरुष गटात अव्वल मानांकित नोवाक जोकोविच, स्वीसकिंग रॉजर फेडरर यांनी चौथ्या फेरीत धडक दिली.
स्लोवाकियाच्या सिबुलकोवाने महिला एकेरीत चौथ्या फेरीत अझारेंकाला 6-2, 7-6 (7-4) ने नमवले. तिने पहिला सेट सहजपणे अवघ्या 44 मिनिटांत जिंकून विजयाचा पाया रचला. दुस-या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंत 63 मिनिटे जोरदार संघर्ष रंगला. टायब्रेकरमध्ये पोहोचलेल्या या सेटमध्ये पुन्हा एकदा स्लोवाकियाच्या खेळाडूने श्रेष्ठत्व सिद्ध करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. वेगवान सर्व्हिस करणा-या सिबुलकोवाने 11 पैकी 6 ब्रेकपॉइंट मिळवले. अझारेंकाला 13 पैकी केवळ 4 ब्रेकपॉइंटच मिळवता आले.
इटलीची सारा इराणी आणि जर्मनीची एंगलिक कर्बर यांनी सुद्धा महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 21 वी मानांकित साराने रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्सोवाला 6-0, 7-5 ने हरवले. 26 वी मानांकित कुज्नेत्सोवाने साराला एक तास आणि 33 मिनिटे झुंज दिली. मात्र, तिला विजय मिळवता आला नाही. 10 वी मानांकित एंगलिक कर्बरने क्रोएशियाच्या पेत्रा मातिकला 6-3, 7-5 ने पराभूत करून अंतिम आठमध्ये प्रवेश मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत सारा इराणी आणि एंगलिक कर्बर आमने-सामने असतील.
नदाल अंतिम 16 मध्ये
सहा वेळेसचा चॅम्पियन स्पेनच्या राफेल नदालने स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दुसरा मानांकित नदालने शनिवारी रात्री उशिरा झालेल्या लढतीत पुरुष एकेरीच्या तिस-या फेरीत अर्जेंटिनाच्या एडुआर्डो श्वांक याला 6-1, 6-3, 6-4 ने पराभूत केले. नदालचा आता अर्जेंटिनाच्या जुआन मोनाकोशी सामना होईल. 13 वा मानांकित मोनाकोने तिस-या फेरीत 19 वा मानांकित कॅनडाच्या मिलोस राओनिक याच्यावर मात केली.
जोकोविच, रॉजर फेडरर चौथ्या फेरीत दाखल
पुरुष गटात अव्वल मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचने दमदार कामगिरी करून चौथ्या फेरीत धडक दिली आहे. जोकोविचने 22 वा मानांकित खेळाडू ए. सिप्पीला 4-6, 6-7 (5-7), 6-3, 7-5, 6-3 ने नमवले. पाच सेटपर्यंत रंगलेल्या या लढतीत सिप्पीने नंबर वन खेळाडूला घाम फोडला होता. सिप्पीने सलग दोन सेट जिंकून जिगरबाज कामगिरी केली. महिला गटाप्रमाणे पुरुष गटातही अव्वल मानांकित खेळाडूचा पराभव होतो काय, असे वाटू लागले होते. मात्र, दोन सेटमध्ये मागे पडल्यानंतर जोकोविचने पुढचे तिन्ही सेट सलग जिंकून आपली ‘दादागिरी’ सिद्ध केली. दुसरा आणि चौथा सेट टायब्रेकरपर्यंत खेचला गेला. दुस-या सामन्यात स्वीसकिंग आणि 16 ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडररने डेव्हिड गॉफिनला पराभूत केले. फेडररने चार सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत 5-7, 7-5, 6-2, 6-4 ने बाजी मारली. पहिल्या सेटमध्ये मागे पडल्यानंतर माजी नंबर वन खेळाडूने अनुभवाच्या बळावर विजय खेचून आणला.
पेस-वेस्निना, सानिया-भूपती उपांत्यपूर्व फेरीत
लिएंडर पेस-एलेना वेस्निना या जोडीने मिश्र दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. भारत आणि रशियाच्या या जोडीने फ्रान्सच्या माथिडेल जोहान्सन आणि मार्क गिक्वल यांना 6-2, 6-0 ने पराभूत केले. इतर एका लढतीत भारतीय जोडी सानिया मिर्झा आणि महेश भूपती यांनी फ्रान्सची जोडी वर्जिनी रोजानो आणि निकोलाय डेव्हिडर यांना दोन सेटमध्ये नमवले. भारतीय जोडीने फ्रान्सच्या जोडीला 7-6 (7-4), 6-3 ने स्पर्धेबाहेर केले. या विजयासह सानिया-भूपती यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
फ्रेंच ओपन: सेरेना विल्यम्सचा धक्कादायक पराभव
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची सुरक्षा बहिरी ससाण्याच्या भरोश्यावर!