आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड सुपर सिरीज: विजय मिळवून सायनाचे पुनरागमन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर - जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सायना नेहवालने शुक्रवारी वर्ल्ड सुपर सिरीज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेतील पराभवाची मालिका खंडित केली. तिने विजय मिळवून स्पर्धेत दमदार पुनरागमनाचे संकेत दिले. भारताच्या खेळाडूने ब गटात कोरियाच्या यिओन जू बेईचा पराभव केला. तिने 21-11, 17-21, 21-13 अशा फरकाने सामना जिंकला. यासाठी तिला तब्बल एक तास शर्थीची झुंज द्यावी लागली.
सलगच्या दोन पराभवांनंतर लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने दमदार पुनरागमन केले. तिने पहिल्या गेममध्ये आक्रमक सुरुवात करून आघाडी मिळवली. तिने चार गुणांची कमाई करताना 4-0 ने आघाडी घेतली. दरम्यान, कोरियाच्या खेळाडूने 6-6 ने बरोबरी साधली होती. मात्र, आऊट ऑफ फॉर्मात असलेल्या सायनाने शर्थीने सलग सहा गुण मिळवून आघाडी मिळवली. या चमकदार कामगिरीसह तिने पहिला गेम आपल्या नावे केला. या वेळी तिने सर्वोत्कृष्ट खेळीचेही प्रदर्शन करत कोरियाच्या खेळाडूला प्रत्युत्तराची एकही संधी मिळू दिली नाही.
दुस-या गेममध्ये बेईची झुंज
कोरियाच्या बेईने दुस-या गेममध्ये पुनरागमन करताना बरोबरी साधली. तिने सायनाला पिछाडीवर टाकून 4-2 ने आघाडी घेतली. या गेममध्ये दोन्ही तुल्यबळ खेळाडूंमध्ये चुरस रंगली होती. आपल्या आक्रमक खेळीला कायम ठेवताना बेईने दुसरा गेम जिंकला.
निर्णायक गेम सायनाच्या नावे
तिस-या आणि निर्णायक गेममध्ये सायनाने बाजी मारली. तिने सलग तीन गुणांची कमाई करताना आघाडी घेतली. ही लय अबाधित ठेवून तिने सामन्यावरची आपली पकड अधिक घट्ट केली. त्यामुळे तिला तिसरा गेम 21-13 अशा फरकाने सहज जिंकता आला.