आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक अडचणीमुळे उषा माने आंतरराष्ट्रीय स्पर्धेपासून वंचित!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी जिद्दीने दोन्ही बहिणीसोबत आखाडा गाजवणारी महिला कुस्तीपटू उषा मानेने अनेक स्पर्धेत ठसा उमटवला. भारतीय महिला कुस्ती संघातून निवडीचे दार ठोठावत असलेल्या उषा मानेची घरची परिस्थिती जेमतेम असून आर्थिक अडचणीमुळे आगामी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पध्रेत सहभागी होण्याची तिची संधी हातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उषा दत्तात्रय माने ही मूळची उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथील दत्तात्रय माने यांची गुणवंत कन्या. उषाचे वडील शेतकरी. यंदाच्या गारपिटीने दत्तात्रय माने यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले. गारपिटीमुळे माने कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले असताना दुसरीकडे उषा मानेची मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात बँकॉक येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पध्रेसाठी निवड झाली. भारतातून 30 महिलांत महाराष्ट्राच्या चौघींची वर्णी लागली. त्यात उषाचा समावेश आहे. सोनिपत (हरियाणा) येथे मंगळवारी कुस्ती महासंघाकडून झालेल्या निवड चाचणीतून त्यांची निवड झाली. उषाबरोबरच कोल्हापूरच्या तिघींचा समावेश आहे.

..तर उषाची संधी हुकणार
उषाची निवड झाल्याची बातमी तिचे वडील दत्तात्रय यांनी दूरध्वनीवरून ‘दिव्य मराठी’ ला दिली. आर्थिक अडचणीमुळे तिची आंतराराष्ट्रीय स्पर्धेत जाण्याची संधी हुकण्याची त्यांना भीती वाटत आहे. नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे त्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले. आता तत्काळ पासपोर्ट काढण्यापासून ते सराव शिबिराला जाण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. सराव शिबिर 20 एप्रिलपासून लखनऊ येथे आहे. लखनऊला जाण्यासाठी तिच्याकडे पैसे नाहीत.

दानशूरांना आवाहन
उषा माने या गुणवंत महिला कुस्तीपटूला आर्थिक मदत करू इच्छिणार्‍यांना बँक ऑफ इंडिया सोलापूर शाखेत 070010110011774 या खाते क्रमांकावर उषा मानेला थेट मदत करता येईल.