आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीचे वृत्त देणा-यांवर तालिबानची वक्रदृष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- सचिन तेंडुलकरला सलाम न करण्याबाबतचे विधान तालिबानी नेत्याच्या तोंडी घुसडण्यात आले असून हा सर्व माध्यमांचा खेळ आहे. अशा प्रकारे अर्धवट तोडून-मोडून विधाने प्रसिद्ध करणा-या माध्यमांनाच आता लक्ष्य बनवले जाईल, असा इशारा पाकिस्तानी तालिबानच्या वतीने देण्यात आला आहे.
तहरीक-ए-तालिबानच्या शूरा मंडळाच्या वतीने नवीन अध्यक्ष मुल्ला फजलुल्ला यांनी याबाबतचे विधान केले आहे. तालिबानचे प्रवक्ते शाहिदुल्ला शाहिद यांनी सचिन आणि मिसबाहबाबत केलेले विधान चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले असल्याने संबंधित माध्यमांनाच आता लक्ष्य केले जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सचिनबाबतचे विधान मोडतोड करून दाखवण्यात आल्याने त्यातून तालिबानची प्रतिमा मलिन करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भित्तानीची गच्छंती
फजलुल्लाने वरिष्ठ कमांडर अस्मतुल्लाह शाहीन भित्तानी याला पदावरून काढून टाकले असून त्याच्या जागी शेख खलीद हक्कानीची निवड केली आहे. त्यामुळे आता मध्यवर्ती शूराचा नवीन अध्यक्ष म्हणून हक्कानी काम पाहणार आहे. या नियुक्तीद्वारे फजलुल्लाने संघटनेतील त्याचे स्थान अधिकच भक्कम केले असल्याचे सूत्रांचे मत आहे.
एका गटाकडे जबाबदारी
सचिनबाबतच्या विधानांना कोणत्या माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने मांडले ते पाहण्यासाठी एका गटाकडे जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचेही न्यूज डेली या वृत्तपत्राशी बोलताना फजलुल्ला यांनी म्हटले आहे. यापूर्वीची जी व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली होती तीत सचिनवर स्तुतिसुमने उधळण्यास तालिबानने बंदी घातल्याचे म्हटले होते. तर तीच चित्रफीत पूर्ण दाखवल्यास तालिबानचा तसा कोणताही फतवा नसल्याचे दिसून येत असल्याचे फजलुल्ला यांनी म्हटले आहे.