आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येलेना इसिनबेवा घेणार जागतिक स्पर्धेनंतर निवृत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को- रशियन पोल्ट वॉल्ट स्टार येलेना इसिनबेवा ऑगस्टमध्ये होणार्‍या जागतिक स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार आहे. बुधवारी पत्रकारांसमोर तिने ही घोषणा केली. हा आपल्यासाठी एक भावुक क्षण असल्याचे तिने सांगितले. कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात खेळाचा पुरेपूर आनंद लुटणार असल्याचेही इसिनबेवाने म्हटले आहे. रशियातच 10 ऑगस्टपासून सुरू होणार जागतिक स्पर्धेत शानदार प्रदर्शन करण्याचा विश्वासही तिने यावेळी व्यक्त केला.

इसिनबेवा म्हणाली, माझ्यासाठी हा चिरस्मरणीय क्षण राहिल. आनंदी वातावरणात मी माझ्या करिअरची सांगता करणार आहे. जागतिक स्पर्धेत शानदार कामगिरी करण्याचा मला पूर्ण विश्वास आहे. या स्पर्धेत उंची आणि स्वत:शीच माझा संघर्ष असेल.

जागतिक स्पर्धेत मी पूर्ण क्षमतेने खेळ करेन. पदकाचा माझा यावेळीही प्रयत्न असेनच. यासाठी चाहत्यांचा उदंड प्रतिसाद अपेक्षित आहे. स्पर्धेत अविस्मरणीय कामगिरी करण्यासाठी पुरेपूर सिद्ध असल्याचे इसिंबायेवाने म्हटले आहे.

बांबू उडीत जग जिंकले !
इसिंबायेवाने पोल्ट वॉल्टमध्ये (बांबू उडी) 2004 आणि 2008 सालच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा भीमपराक्रम केला होता. 5.06 मीटर उंच बांबू उडी मारण्याचा सध्याचा विक्रमही या पोल्ट वॉल्ट स्टारच्या नावावर आहे.