आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth Cricket Out Of World Cup , Latest News, Divya Marathi

युवा संघ वर्ल्‍डकपमधून बाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई-गतविजेत्या भारताचा एका रोमांचक सामन्यात शनिवारी अंडर 19 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडकडून उपांत्यपूर्व सामन्यात तीन गड्यांनी पराभव झाला. या सामन्याचा निकाल अखेरच्या षटकात लागला. निर्धारित 50 षटकांत भारताला 8 बाद 221 धावांवर रोखल्यानंतर माजी चॅम्पियन इंग्लंडने 49.1 षटकांत 7 बाद 222 धावा काढून उपांत्य फेरी गाठली.
अखिल, अंकुश अपयशी
भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जोडी अंकुश बिन्स (3) आणि अखिल हेरवाडकर (2) स्वस्तात बाद झाले. मध्यल्या फळीतील भरवशाचा फलंदाज संजू सॅमसन भोपळाही फोडू शकला नाही. रिकी भुई 7 धावा काढून बाद झाला. संघाच्या 4 बाद 24 धावा असताना आलेल्या कर्णधार विजय झोलने 85 चेंडूंत 48 धावा काढल्या. त्याला स्थिरावण्यापूर्वी सायेरने डकेटकरवी झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या दीपक हुडाने अर्धशतक झळकावले. त्याने 99 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 68 धावा काढल्या. अष्टपैलू खेळाडू सरफराज खानने पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावत येऊन नाबाद 52 धावा काढत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. अब्दुल गनीने 7 व कुलदीपने 16 धावा काढल्या. इंग्लंडच्या मॅथ्यू फिशरने 10 षटकांत 55 धावा देत 3 गडी बाद केले. सरफराजची तीन अर्धशतके : सरफराजने तीन अर्धशतके झळकावली. त्याने इंग्लंडविरुद्ध 52 धावा ठोकल्या. त्यापूर्वी त्याने पाकविरुद्ध 74 व आफ्रिकेविरुद्ध नाबाद 53 धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक
भारत : 8 बाद 221.
विजय झोल 48,
दीपक हुडा 68,
सरफराज खान नाबाद 52 धावा.
फिशर 3/55.
इंग्लंड : 7 बाद 222.
डकेट 61,
क्लार्क 42 धावा.
कुलदीप यादव 3/46.
भारताच्या सरफराजची फलंदाजीत, तर कुलदीपची गोलंदाजीत चमक
झोल-हुडाची अर्धशतकी भागीदारी
संघ संकटात असताना कर्णधार विजय झोल (48) आणि दीपक हुडा (68) या जोडीने पाचव्या गड्यासाठी 87 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. संघाच्या 111 धावा असताना कर्णधार विजय झोलला सायेरने डकेटकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली.
डकेटच्या 61 धावा
धावांचा पाठलाग करताना इंग्लिश संघाची टीम एकवेळ 3 बाद 41 धावा अशी संकटात सापडली होती. मात्र, प्लेअर ऑफ द मॅच बेन डकेटने 61, एड. बर्नार्डने 24, जो. क्लार्कने 42 आणि रॉब जोन्सने नाबाद 28 धावा काढून इंग्लंडला विजय मिळवून दिला. सायेरने नाबाद 10 धावांचे योगदान देत इंग्लंडला 5 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला. कुलदीपने 3 गडी बाद करताना भारताच्या आशा जागवल्या होत्या. मात्र, त्याचे प्रयत्न अपुरे पडले. मिलिंद, मोनू कुमार, हुडा व गनी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.