आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडमध्ये सराव करून संघात परतणार जहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सध्याच्या भारतीय संघातील मध्यमगती गोलंदाजांमध्ये सर्वाधिक अनुभवी गोलंदाज आहे जहीर खान. मात्र, फिटनेसच्या कारणास्तव त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. राष्ट्रीय निवड समितीचा निर्णय हंगामी आहे का कायमस्वरूपी, ते कळणे कठीण आहे.
मुंबईत आयपीएल सामन्यात खेळताना जहीर खानच्या डाव्या खांद्याचा, पाठीचा स्नायू दुखावला. डॉक्टरांनी त्याला 6 आठवड्यांची विर्शांती सांगितली. त्यापैकी 2 आठवडे शिल्लक होते, असे असतानाही पुढील महिन्यात सुरू होणार्‍या कसोटी मालिकेसाठी निवड समितीने जहीरच्या फिटनेसची वाट का पाहिली नाही?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवड समिती सदस्यांना जहीरची फिटनेस पडताळून पाहण्यासाठी नजीकच्या काळात स्थानिक क्रिकेट स्पर्धा होणार नाहीत. त्यामुळे 2003-04, 2009-10, 2011च्या परदेश दौर्‍यांमधून परतलेल्या जहीरबाबत त्यांना धोका पत्करायचा नव्हता. मात्र, निवड समितीच्या या प्रश्नाला जहीर खान कौंटी क्रिकेट खेळून उत्तर देऊ शकतो. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा मोठा आहे. तब्बल ऑगस्ट महिन्यापर्यंत लांबलेल्या या दौर्‍यात इंग्लंडमध्ये खेळून आपली तंदुरुस्ती सिद्ध केल्यास जहीर खानचा विचार होऊ शकतो. जहीर खानने प्रत्येक दुखापतीनंतर व भारतीय संघाबाहेर फेकले गेल्यानंतर इंग्लंडमध्ये कौंटी व क्लब क्रिकेट खेळूनच पुनरागमन केले आहे.

मात्र, दुसरीकडे निवड समितीने 8 नवोदित गोलंदाजांना आजमावण्याचा प्रयत्न करताना त्यातून भावी भारतीय गोलंदाज मिळू शकेल, असा आशावादी दृष्टिकोन ठेवला आहे. नवोदितांकडे गुणवत्ता आहे. मात्र, नवोदितांची तंदुरुस्ती किती टिकेल हा दुसरा यक्षप्रश्न आहे. कारण उत्तम गुणवत्ता दाखवून आशा निर्माण करणारे प्रवीणकुमार, उमेश यादव, ईशांत शर्मा असे अनेक गोलंदाज सातत्याने फिटनेस समस्येमुळे संघाबाहेर आहेत. न्यूझीलंड दौर्‍यापासून आयपीएलपर्यंत ईशांत शर्मादेखील मोठे क्रिकेट खेळलेला नाही. यंदाच्या आयपीएलमध्येही त्याने विश्रांती का घेतली, हे एक कोडेच आहे.
पुनरागमनाची आशा
दोन आठवड्यांनंतर होणार्‍या फिटनेस चाचणीत जहीर खान यशस्वी झाल्यास इंग्लिश कौंटी किंवा क्लब क्रिकेटमध्ये खेळून फॉर्ममध्ये येण्याचा विचार करत आहे. यापूर्वी मूळ भारतीय संघात नसलेल्या, परंतु इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळत असलेल्या भारतीय गोलंदाजांना ऐन मोक्याच्या क्षणी संघात स्थान दिले गेल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे जहीर खान आशावादी आहे.