आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झिम्बाब्वेवर 9 गडी राखून मात; भारतीय युवा संघाचा दणदणीत विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टणम- रविवारी झालेल्या सामन्यात भारताच्या 19 वर्षांखालील संघाने झिम्बाब्वेवर 9 गडी व 22 षटके राखून दणदणीत विजय मिळवला. सलामीवीर बिन्सने (134) शानदार शतक ठोकले. अखिल हेरवाडकरने (88) सलग दुसरे अर्धशतक लगावले. झिम्बाब्वेने दिलेल्या 245 धावांचे आव्हान भारताने 1 गडी गमावत पूर्ण केले.

प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 50 षटकांत 9 बाद 245 धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने 28 षटकांत 1 गड्याच्या मोबदल्यात 246 धावा काढत विजय मिळवला. संघाने 8.78 च्या सरासरीने लक्ष्य गाठले. सलामीवीर बिन्स आणि हेरवाडकरने आक्रमक फलंदाजी करत 148 चेंडूत 218 धावांची जबरदस्त सलामी दिली. बिन्सने 89 चेंडूंचा सामना करताना 14 चौकार आणि 7 षटकार खेचत शतक ठोकले. हेरवाडकरने 71 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकाराच्या मदतीने नाबाद अर्धशतकी खेळी केली. कर्णधार विजय झोलने 10 चेंडूंत 2 चौकारासह नाबाद 11 धावा काढून संघाचा विजय निश्चित केला.

गुमबई, चितुंबाचे अर्धशतक व्यर्थ
झिम्बाब्वेतर्फे सलामीवीर जे. गुमबइने 104 चेंडूत 10 चौकारासह 60 धावा काढल्या. मैदानावर जम बसवलेल्या गुमबईला सेठीने त्रिफळाचित केले. त्यानंतर आलेल्या सी. चितुंबाने 80 चेंडूत 13 चौकार लगावत 83 धावा केल्या. भारताच्या सेठीने 9 षटकांत 36 धावा देत 3 गडी बाद केले. त्याने यात 2 षटके निर्धाव टाकले.

संक्षिप्त धावफलक
झिम्बाब्वे : जे. गुमबइ 60, सी. चिंतुबा 80, जॉगव्हे 34 धावा. सेठी (36/3), लांबा (55/2). भारत : बिन्स 134, अखिल हेरवाडकर नाबाद 88, विजय झोल नाबाद 11 धावा. लाके (51/1).