सिल्हेट - टी-20 क्रिकेटचा थरार सोमवारी सार्या विश्वाने अनुभवला. विश्वचषकाच्या पात्रता फेरीत दोन दुबळय़ा संघांत कांटे की टक्कर झाली. अगदी शेवटच्या चेंडूवर आयर्लंडने विजयाला गवसणी घातली. नाणेफेक हरून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या झिम्बाब्वेने 20 षटकांत 5 बाद 163 धावा काढल्या. आयर्लंडने इतक्याच षटकात 7 गडी गमावून हे आव्हान गाठले. 3 गड्यांनी विजयाचे रंग उधळले.
आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडने दणकेबाज सुरुवात केली. पोर्टरफिल्ड आणि स्टिरलिंगने 80 धावांची वेगवान सलामी दिली. पोर्टरफिल्डच्या छोटेखानी 31 धावांत 3 चौकार आणि 1 षटकार होता. त्यानंतर स्टिरलिंगने खेळाची सूत्रे हाती घेतली. तो बाद होताच जॉयसे-पॉयंटरने धावफलक हलता ठेवला. डावाला आकार दिला. जॉयसेच्या 22 आणि पॉयंटरच्या 23 धावांनी आयर्लंडला विजयाची स्वप्नं पडू लागली होती. भरवशाच्या ओब्रीयनने 10 चेंडूत 17 धावा ठोकून झिम्बाब्वेपासून विजय दूर नेला.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून फलंदाजी करणार्या झिम्बाब्वेने 20 षटकांत 163 धावा जमवल्या त्या टेलरच्या अर्धशतकाच्या (59) बळावर. मस्सकाद्झा, चिंगम्बुरानेही उपयुक्त खेळी करून संघाला दीडशेपार नेले. 17 व्या षटकात टेलर बाद झाल्यामुळे झिम्बाब्वेच्या धावांना वेसण बसली. विल्यिम्स आणि सिबांधाने प्रत्येकी 16 धावांचे योगदान दिले. या सामन्यात अनुभवी झिम्बाब्वेचे पारडे जड मानले जात होते. त्यांची फलंदाजी पाहूनही याची प्रचिती येत होती. मात्र आयर्लंडच्या फलंदाजांनी न भूतो न भविष्यची कामगिरी करून चकित केले.
स्टिरलिंग नावाचे वादळ!
आयर्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो स्टिरलिंग. 34 चेंडूत 9 चौकार आणि एका गगनचुंबी षटकाराची बरसात करून त्याने 60 धावा चोपून काढल्या. त्यामुळे 10 षटकांतच आयर्लंडच्या 100 धावा फलकावर लागल्या. स्टिरलिंगच्या वादळामुळेच आयर्लंडने षटकामागे 10 च्या सरासरीने धावा जमवल्या. 10 व्या षटकात स्टिरलिंग बाद झाला. तरीही इतरांनी धमक दाखवून विजय खेचून आणला.
संक्षिप्त धावफलक :
झिम्बाब्वे 20 षटकांत : 5 बाद 163 धावा : (मस्सकाद्झा 21, टेलर 59, चिगंम्बुरा 22, सिबांधा 16, विल्यिम्स 16, डॉकरेल 2/18, मॅकब्राइन 2/26)
आयर्लंड 20 षटकांत : 7 बाद 164 धावा : (पोर्टरफिल्ड 31, स्टिरलिंग 60,जॉयसे 22, पॉयंटर 23, ओब्रीयन 17. पनयंगारा 4/27, चतारा 1/20, विल्यिम्स 1/27).