आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निमित्त \'व्हॅलेंटाइन डे\'चं...एका प्रेमाची गोष्ट..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात.....
सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेकजण भेटतात....
खुप जण आपल्या जवळ येतात आणि दूरावतातही....
आणि सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी..!


ही गोष्ट आहे बालमित्रांमधील अनोख्या प्रेमाची! कितीही दूर असले तरी सदैव सोबत असल्याची जाणीव करून देणारी... 'प्रेम' या अडीच अक्षराची किमयाच निराळी आहे.“पाहताक्षणी कोणीतरी पटकण आवडणं म्हणजे आकर्षण, आकर्षणाचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात...तर प्रेमाचं रूपांतर श्रद्धेत झालं की त्या प्रेमाचं नातं कायमस्वरूपी टिकणारं असतं”

पहिला, दुसरा वर्ग ती आजीकडे शिकली. ते दोघंही गावात प्रतिष्ठीत घराण्यातले. तिचे आजोबा शिक्षक (आईचे वडील) आणि त्याचे वडील पटवारी. शाळेत एकाच वर्गात. रोज शाळेत जाताना दोघंही एकमेकांचा हात पकडून जात. शाळेत सोबत-सोबत असणं आजच्या घडीला ते नगण्य असलं तरी, त्याकाळी तो गावातील आज्यांचा चर्चेचा विषय बनला होता. गंमतीचा भाग असला तरी मुलगा-मुलगी सोबत राहणे हीच मोठी गोष्ट होती.

दूसरीची परीक्षा संपल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला शहरात त्यांच्याजवळ शिकायला आणलं. वर्षांमागून वर्षे जात होती. काही वर्षांनी आजोबा सेवानिवृत्त झाले आणि ते गावानजीकच्या शहरात राहायला आले होते. तिच्याकडे घरात आर्थिक भरभराट असली तरी, मानसिक शांतता आणि समाधानासाठी रोजंच झगडावं लागायचं. कशीबशी दहावीची परीक्षा संपवली आणि हट्ट करून पुन्हा ती आजीकडे शिकायला शहरात आली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या. कॉलेज सुरू व्हायला अजून दोन महिने शिल्लक होते. आजीच्या घराला अंगणात मोठा ओटा बांधलेला होता. आजीकडे तीन वेगवेगळे वृत्तपत्र यायचे ते सगळ्यांना वाचता यावे म्हणून ओट्याशेजारी दारात ठेवलेले असायचे. पण एक मुलगा रोज नं चुकता संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी वृत्तपत्र मागायला यायचा. आणि ती शांतपणे त्याच्या हातात ती वृत्तपत्रे द्यायची. असं साधारण एक आठवडाभर तरी चाललं. आजी ओट्यावर बसलेली होती, नेहमीप्रमाणे तो वृत्तपत्र मागायला आला आणि त्यानं आजीला हळूच विचारलं... आजी... ही रंजू का? आजीने लगेच तिला हाक मारली आणि म्हणाली, “तुम्ही एकमेकांना अजून ओळखलं नाही? लहानपणी तुम्ही एकाच वर्गात होतात. आठवलं.., आणि दोघांनी एकमेकांकडे आश्चर्यानी पाहिलं. दोघांनाही मनात वाटायचं कदाचीत आम्ही एकमेकांना ओळखतो, मात्र बोलण्याचं धाडस झालं नाही. तब्बल नऊ वर्षानंतर त्यांची भेट झाली होती. लहानपणीच्या गोष्टी आठवू लागल्या होत्या आणि इथूनच त्यांच्या मैत्रीला नवं वळण मिळालं.

दोघांचं घर जवळ-जवळ होतं. त्यामुळे एकमेकांच्या घरी जाणं, गप्पा, गोष्टी हे तर आता नित्याचंच झालं. नऊ वर्षातला संपूर्ण आढावा दोघांनी एकमेकापूढे सादर केला....गावच्या शाळेतून इथे आल्यानंतर त्याच्याहून फक्त पंधरा दिवसांनी मोठी असलेली, पण आईसारखी माया करणारी ताई भेटली होती. (गुड्डी) तीच्याबद्दल तो खूप कौतुकानं सांगायचा, त्यांच्या रोजच्या बोलण्यात तीचा विषय कायम असायचा. आणि आजही असतो....(दूर्दैवाने आज ती या पृथ्वीवर नसली तरी त्यांच्यात सदैव असेल)

जुलै महिन्यात कॉलेज सुरू झालं. त्या दोघांचं कॉलेज वेगवेगळं होतं मात्र केमिस्ट्रीचा क्लास एकत्र होता, गुड्डीच्या मामांकडेच. तिच्या कॉलेजच्या पहिल्या दिवशी त्याच्या ताईसोबत भेट झाली. दोघी खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. कॉलेजमध्ये ती सगळ्यांची आदराची मैत्रिण होती. तिच्यामते मैत्रीचं रूपांतर प्रेमात होणं चूकीचं होतं...आणि आम्ही सगळ्यांनी ते कटाक्षाणं पाळलं. त्यावेळी बहुतेक तरुणांची हीच मानसिकता असावी. म्हणूनच “तूझे मेरी कसम” हा सिनेमा तरुणांमध्ये हीट झाला असावा.

आत्तापर्यंत सदैव वडिलाच्या अत्यंत धाकात जगणारी रंजू! आता आजी- आजोबा, मामा यांच्यासोबत खूप खूश होती आणि मोकळ्या वातावरणाचा आनंद घेत जगत होती. रंजू – किशोर समिकरणंही चांगलं जूळलं होतं. सगळ्यांना त्यांच्यात काहीतरी....चाललंय असं वाटायचं. पण ते दोघं त्याबाबत अनभिज्ञ होते. कोजागिरीच्या रात्री गाण्याच्या भेंड्या खेळत असताना दोघांच्याही मनात लाईट लागला. मात्र तो त्या वेळेपूरताच...मनात काय चालंलय हे उकलण्याचं धाडस दोघांमध्येही नव्हतं...बारावीची परीक्षा संपली आणि त्याला एक शब्दही काही न सांगता ती तिच्या आईसोबत परतीच्या वाटेने निघाली. त्याला कळताच पळत पळत त्याने बसस्टॉपच्या रस्त्यात त्यांना गाठलं. तिची आई आणि ती तिच्या गावाला जात होती. बसमध्ये चढताना त्याने तिच्याकडे एक गिफ्ट पॅकींग असलेली पिशवी दिली. घरी गेल्यावर उघड एवढंच तो त्यावेळी बोलला. त्यात छोटासा गणपती आणि मैत्री-प्रेम असं ग्रीटींग होतं....पण तरीही दोघांनीही याविषयी काहीही न बोलण्याचं जणू व्रतंच घेतलं असावं....पूढे त्याच वर्षी त्याला मेडिकलला प्रवेश मिळाला. आणि तिने बी.ए.ला प्रवेश घेऊन पत्रकारीतेची नोकरी सूरू केली. तिच्या घरची परिस्थिती “जैसे थे” ‘दिवस सोनियाचा, रात्र वैर्‍याची’ असं म्हणत जगायचं..., बी.ए.च्या दुस-या वर्षाला असतानाच तिचं लग्न झाल्याचं कळलं. लग्नाचा निर्णय त्याला फोनवरूनच कळविला. आणि वेडी, अपेक्षा करत होती. आता तरी तो काही बोलेल...पण निर्णयाला सहमती अपेक्षित असते. पुढच्याचं मत नाही....तो शांत होता.... तिचं लग्न झालं....मात्र तिची परिस्थिती फारशी बदलली नाही. आतापर्यंत घरात सूख, समाधानासाठी झगडत होती, आता अशिक्षित लोकांच्या जाळ्यात विणल्या गेली होती. तिचं शिक्षण आणि पत्रकारीता चालूच होती. समाजात तिचं स्वत:चं वेगळं अस्तीत्व निर्माण करण्यात यशस्वी झाली. नवरा प्रेमळ आणि माणूस म्हणून खूप चांगला....पण दोघांमधील वैचारिक दरी फार खोल होती. आणि एक दोन वर्षात नवर्‍याकडूनही दारू पिण्यासारख्या अनपेक्षित गोष्टी घडायला लागल्यात, चारचौघात तिचा त्याच्याकडून अपमान व्हायला लागला आणि हळूहळू सगळंच लयाला गेलं. कधीतरी कुठल्या सणांना फोनमधून भेटणारा बालमित्र तिच्या या परिस्थितीत रोज तिच्या संपर्कात होता. तिला धीर द्यायचा. सगळं नीट होईल असं समजावत होता. दारूपायी नवर्‍या व्यवसाय ठप्प झाला होता. तिचीही नोकरी सुटली होती. काही महिने असेच गेले. तिला एका जॉबची ऑफर आली. मोठ्यांच्या सल्ल्याने तिने तो स्विकारला. जॉब दूस-या शहरात होता. घरचेही पर्यायाअभावी नाही म्हणू शकले नाही. पण पुढे मात्र घरच्यांनीही तिच्याशी बोलणं टाळलं. आणि नवराही शांतच. शहर मोठं होतं आणि एकटं घराबाहेर राहण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. पण ती डगमगली नाही. तिथं शिकायला असणार्‍या जुन्या मैत्रिणीच्या मदतीनं हॉस्टेल शोधलं. ती रात्र ती मैत्रिणीच्या खोलीवर राहिली. दुस-या दिवसापासून हॉस्टेल, तुटपूंजा पगाराची नोकरी आणि ती..फोनवरून ते दोघे एकमेकांच्या सोबत होते. हाच एवढा तिचा आधार होता. पहाटेपासून रात्रीपर्यंत तो तीच्या सोबत असायचा. प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायचा. कधी नं मिळालेल्या या प्रेमाने ती मोहरुन गेली होती. जगण्याला नवी उमेद मिळाल्याची जाणीव झाली पण त्याचक्षणी कर्तव्याचा महामेरू तिच्यापूढे उभा ठाकायचा. कर्तव्यापूढे तिला प्रेमाचा मोह आवरावा लागला. कारण तिच्यासाठी या स्वप्नांची दारं केव्हाच बंद झाली होती. काही महिन्यांनी नवरा तिच्यासोबत राहायला आला. त्यामुळे हळू-हळू त्याचे फोन येणंही कमी झालं. तिच्या नवर्‍यानंही दारू सोडली. मात्र स्वभाव मात्र 'जैसे थे'.... पण काय आहे की नवरा कसाही असला तरी त्याला सांभाळून घेणं हे स्त्रीचंच कर्तव्य असतं असं म्हणतात. त्याप्रमाणे तिने त्याला सांभाळलं....अजूनही सांभाळतेय.

परंतु, आजही 'तो' तिच्यावर मनापासून प्रेम करतोय. तिच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतोय. कर्तव्य सांभाळून, प्रेमाचा नाजूक बंध ते हळूवारपणे जपत आहे. फोन हा त्यांच्यातील महत्त्वाचा दुवा बनलाय.... आजही तिची सावली बनून तिच्यासोबत आहे तो... सुरूवातीलाच म्हटल्याप्रमाणे– 'प्रेमाचं रूपांतर श्रद्धेत झालं की ते नातं कायमस्वरूपी आणि अतूट असतं.....'
म्हणूनच,
“भलेही मेरा दिल बहूत छोटा है,
तुम्हारी जगह इसमे खाली रहेगी....
और तुम मेरी रहो या कीसी और की,
ये धडकने सिर्फ तुम्हारी रहेगी..."