आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LOVE STORY: \'इंद्रधनु\'च्या निर्मितीतून सप्तरंगी झाले अवि-असिचे प्रेम..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Avi With  Asi - Divya Marathi
Avi With Asi

''प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं...तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं..!'' कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील या दोन ओळी प्रेमाला कोणताही वर्ग नसतो, धर्म नसतो, जात नसते, असा संदेश देता‍त. एवढेच नाही ''माझं काय, तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!'' ही त्यांची कविता प्रेमीयुगलांच्या मनाची अस्वस्थता दर्शविते...

प्रेम व्यक्त व्हायला 'व्हॅलेंटाईन डे'च का? ते आपण कधीही, कुठेही व्यक्त करू शकतो, असं म्हणणारेही खूप आहेत. ज्याप्रमाणे प्रेमाला धर्म, जात- पातीची मर्यादा नसते. त्याप्रमाणे प्रेम व्यक्त व्हायला ठराविक दिवसाचा हट्ट का करायचा? असं सांगणारी सोलापुराच्या अवि आणि असि यांची 'लव्हस्टोरी...!'

अविनाश कुलकर्णी आणि असिलता अग्निहोत्री-कुलकर्णी हे दोघेही सोलापूरचे. सोलापुरातील हिरानंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सचे ते माजी विद्यार्थी. बी.कॉमचे द्वितीय वर्ष मात्र या दोघांच्या आयुष्यात सप्तरंगाची उधळण करणारं ठरलं. अवि अर्थात अविनाश आणि असि अर्थात असिलता या दोघांची ओळख झाली ती एका मासिकाच्या निर्मितीच्या माध्यमातून...! 'इंद्रधनू' असे मासिकाचे नाव. 'इंद्रधनू'च्या निर्मितीतून अवि-असिचं प्रेम बहरत गेलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

'इंद्रधनू'मध्ये प्रसिद्ध होणारे लेख, कविता, चारोळी यांच्या साहित्याबाबत अवि- असि दररोज भेटत. सततच्या चर्चा तसेच अधून-मधून होणार्‍या वाद-विवादात ते एकमेकांमध्ये कसे गुंतले हे त्यांनाही कधी कळले नाही. परंतु सुरुवात करणार कोण? हा दोघांनाही पडलेला मोठा प्रश्न...

कॉलेजमध्ये असिचं राहणीमान एकदम वेस्टर्न. ती कायम जीन्स, टॉपमध्ये दिसायची. अगदी डॅशिंग होती ती. अविला ती 'कुछ कुछ होता है' मधील अंजली (काजोल) भासायची. आणि याच अंजलीने अविच्या मनात प्रेमाचा अंकूर फुलविला. बी. कॉमचं तिसरं वर्ष सुरु झाल्यानंतर दोघांनाही त्यांच्यात फुलणारं 'अबोल प्रेम' क्लिक झालं. परंतु हे व्यक्त करायचे कसं? शेवटी सुरुवात अविनेच केली. असिला 'प्रपोज' करण्यासाठी अवि दररोज कॉलेजात गुलाब घेऊन यायचा परंतु असि समोर आली की, मनातले शब्द ओठावर आयला वेळ लावत. तेवढ्यात ती निघून जायची. अखेर अविनं 'फ्रेंडशीप डे'च्या कार्यक्रमाचं निमित्त साधून असिला 'रेड रोज' द्यायचा प्लान केला. एरव्ही जीन्स आणि टॉपमध्ये दिसणारी असि चक्क साडी नेसून येणार होती. त्यामुळे तिला पाहण्याची अविची उत्सुकता शिगेला पोहचली होती. सगळे आले परंतु मॅडमचा अजूनही पत्ता नाही, असं तो स्वत:शीच पुटपुटत होता. कार्यक्रम सुरु व्हायला काही मिनिटेच शिल्लक होती. तेवढ्यात असि आल्याचा एकाने निरोप दिला. परंतु ती तिच्या बहिणीच्या क्लासमधील प्रोग्राम अटेंड करणार असल्याचेही कळले. काय करावे अन् काय नाही, अशी अविची अवस्था झाली होती. याच गडबडीत त्याने वहीच्या पानावर 'प्रेम संदेश' लिहिला. पानाची घडी करून त्यावर 'लाल गुलाब' ठेवला आणि पाठवून दिला असिकडे... बराच वेळ झाला तरी असिचं उत्तर आलं नाही म्हणून अवि बैचेन झाला होता. तेवढ्यात असि आली. तिने स्मित हास्य केले परंतु काहीच बोलली नाही. अन् काही क्षणानंतर 'आय आल्सो लव्ह यू...!' असं म्हणत तिनं अविच्या प्रेमाचा स्विकार केला... त्यानंतर अवि-असिची 'लव्ह एक्स्प्रेस' थांबली ती थेट लग्न मंडपातच...!

27 मे 2003 रोजी अवि आणि असि साताजन्माच्या प्रवासाला निघाले. त्यानंतर या दोघांच्या प्रेमाच्या बहरलेल्या वेलीवर एक गोंडस 'कन्यारत्न' फुलले. विशेष म्हणजे हे दोघेही यंदा प्रेमविवाहाचा 'दशकपूर्ती' साजरा करतायेत.

दरम्यान, अविनाश कुलकर्णी हे एका प्रतिष्ठित बॅंकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत तर असिलता ह्या पार्टटाईम टॅक्स कन्सलटन्सीचे काम पाहताहेत. खर्‍या प्रेमात प्रचंड ताकद असते. त्याला कोणताच अडसर येत नाही: परंतु इच्छाशक्तीही असणे गरजेचे असते. तेव्हाच तुम्ही सारं जग प्रेमाने जिंकू शकाल..!
(sandip.p@dainikbhaskar.com)