आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुदुम्बश्रीला मिळाला पायलट प्रोजेक्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - केरळमधून गरिबीचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी 1998 मध्ये आरंभलेली कुदुम्बश्री ही मोहीम आज देशातील सर्वात मोठय़ा महिला सबलीकरण प्रकल्पांपैकी एक आहे. या मोहिमेचे 37 लाख सदस्य आहेत आणि केरळमधील 50 टक्के घरांना तिचा आधार आहे. सातत्यपूर्ण प्रयत्नांतून कुदुम्बश्रीने आज मूलभूत सुविधांपासून वंचित महिलांच्या गरजा भागवण्यात यश मिळवले असून त्यांना स्वाभिमानाचे जीवन आणि उत्तम भवितव्याचा मार्ग खुला केला आहे.

प्रगतीच्या वाटेवर सतत अग्रेसर असलेल्या या संस्थेने नुकताच रेल्वे सफाईचा पायलट प्रोजेक्ट मिळवला आहे. भारतीय रेल्वेने गाड्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी बाहेरील संस्थांवर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मंगला एक्सप्रेसच्या स्वच्छतेचा प्रारंभिक प्रकल्प कुदुम्बश्रीला मिळाला आहे. कुदुम्बश्रीने ही जबाबदारी संस्थेतील नऊ महिला व तीन पुरुषांवर सोपवली आहे. संस्थेच्या जिल्हा मोहीम समन्वयक तानी थॉमस यांनी सांगितले की, हा प्रकल्प यशस्वी झाल्यास कुदुम्बश्रीला इतर रेल्वेगाड्यांच्या सफाईचे कामही मिळेल.

याशिवाय कोची येथे महिलांच्या फिटनेससंबंधी आणखी एक प्रकल्प संस्था राबवत आहे. नागरी गरिबी निर्मूलन विभागाद्वारे मिळालेल्या या प्रकल्पाअंतर्गत शहरात दोन व्यायामशाळा सुरू केल्या जातील. कुदुम्बश्रीचे सदस्य त्या चालवतील. जर या जिम यशस्वी ठरल्या तर हेल्थ ट्रेडिंग मशीन, स्टेशनरी बाइक्स, स्लिमिंग मशीन, फोर स्टेशन जिम मशीन, जिम बॉल आणि इलिप्टिकल ट्रेनिंग मशीन अशी आधुनिक यंत्रसामग्रीही येथे आणली जाईल.