आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकील बनून दिला कायदेशीर लढा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेकडो एकर जमिनीचे वारसदार असलेल्या कुटुंबात दलजित कौर सून म्हणून गेल्या. काही दिवसांतच त्यांना कळले की, त्यांच्या स्थावर मालमत्तेवर 39 खटले आहेत. घरातील बहुतांश पैसा खटले लढण्यातच जात होता. जमीन जवळपास हातातून जाणारच होती.

दलजित सांगतात की, कायद्याच्या कचाट्यात सापडल्यामुळे कुटुंबीयांचा धीर पूर्णपणे खचला होता. दरवेळी ती सासरे हरचरण सिंह यांच्यासोबत वकिलांकडे जात असे आणि ते कागदावर पुढची तारीख लिहून देत असत. अशा खेट्या घालण्यात 12 वर्षे गेली. दलजित दोन मुलांच्या आई झाल्या होती, पण खटल्यांशी संबंधित कामात त्या व्यग्र असत. घरातील लोक म्हणत होते, आमचे प्रयत्न संपले, आता तूच काही करू शकलीस तर बघ. दलजित कौर यांनी निर्णय घेतला. लग्नानंतर 12 वर्षांनी वकिलीचे शिक्षण घ्यायचे ठरवले.

कुटुंबीयांसमोर निर्णय बोलून दाखवला तेव्हा त्यांनी विरोधही केला नाही आणि प्रोत्साहनही दिले नाही. एलएलबीमध्ये प्रवेश घेतला. 2001 मध्ये वकिलीचा परवाना मिळाला. फक्त वर्षभरातच, म्हणजेच 2002 मध्ये कायदेविषयक ज्ञानाच्या जोरावर त्यांनी चंदिगडमधील जमिनीचा खटला जिंकला. आज 12 वर्षांनंतर त्यांनी 38 खटले जिंकले आहेत. दरम्यानच्या काळात त्यांना समाजातील प्रतिष्ठित लोकांशी झगडावे लागले, पण त्यांच्या धाडसापुढे कोणाचेही चालले नाही. राजकारण्यांचे दडपण आले तरी धीर खचला नाही. दलजित यांनी एक खटला सोडून दिला आहे. इतर सर्व खटले जिंकून त्यांनी कुटुंबाच्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत.

अनिवासी भारतीयांकडून पीडित तरुणींसाठी काम करताना दलजित यांना आलेले अनुभव-

* स्त्रीला पुरुष होण्याची गरज नाही. स्वत:मधील सर्व शक्तींचा वापर करून ती यश मिळवू शकते.

* पंजाबमधील एनआरआय पतींकडून फसवणूक होण्याच्या समस्येमागे कमी होणार्‍या जमिनी आणि ऐशोआरामात आयुष्य जगण्याची सवय ही कारणे आहेत.

* बहुतांश मुली आई-वडिलांच्या इच्छेखातर असे लग्न करतात, पण त्यांनी उत्तर देणे शिकले पाहिजे.

* ‘हॉलिडे मॅरेज’चा अभिशाप नष्ट करण्यासाठी कठोर आंतरराष्ट्रीय कायदे आणि जागरूकता आणण्याची आवश्यकता आहे.

पंजाबने बदलला कायदा

एनआरआयसंबंधी समस्या टाळण्यासाठी अनिवासी भारतीयांसाठी सक्तीचा विवाह नोंदणी कायदा 2012 अंतर्गत विवाह नोंदणी करणे आवश्यक आहे. याअंतर्गत विवाहासंबंधी संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.

महिलांनो हे लक्षात ठेवा

शेतजमीन असेल तर सातबारासंबंधी सर्व माहिती ठेवा.

जमीन किंवा घर खरेदी करताना महसुलाची नोंद अवश्य तपासून पाहा. ही नोंद नेहमी अपडेट ठेवा.

घर, शोरूम, दुकान इत्यादींची कागदपत्रे स्वत:जवळ ठेवा आणि स्वत:चे वारसदार ठरवा.

वकिलांकडे खटला देण्यापूर्वी एखाद्या मुद्दय़ावर तुम्ही समाधानी नसाल तर इतर दोन तीन वकिलांचा सल्ला अवश्य घ्या. जो वकील तुमचे म्हणणे समजून घेईल, जिथे संवाद पूर्ण होईल, त्याच वकिलावर जबाबदारी सोपवा.