आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन विशेष : स्वरूप जे बोलते, ते करून दाखवते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वरूप संपत युनिसेफच्या अँम्बेसेडर आहेत. एके काळची मिस इंडिया आणि प्रसिद्ध अभिनेत्री स्वरूपचा पती परेश रावल यांना अभिमान आहे. अमेरिकेत एका शूटिंगमध्ये गुंतलेल्या परेशना जागतिक महिला दिनानिमित्ताने स्वरूप यांच्याविषयी मत मांडायची विनंती केली तेव्हा ते आनंदाने तयार झाले.

‘स्वरूप माझ्यासाठी असे व्यक्तिमत्त्व आहे, जिचा आतील आणि बाहेरील चेहरा एकच आहे. मी तिला काम करताना पाहिले आहे. शरीर आणि मन दोन्ही थकेपर्यंत तिने काम केले आहे, पण मी कधीही तिच्या तोंडून ‘थकले’ हा शब्द ऐकला नाही. याउलट चेहर्‍यावर नेहमी समाधान पाहिले आहे. मनात आले ते करून दाखवल्याचे समाधान.

1979 ची गोष्ट आहे. मिस इंडिया कॉन्टेस्टमध्ये तिला विचारण्यात आले ‘तुम्हाला पुढे काय करायचे आहे?’ तिने उत्तर दिले होते , ‘शिक्षण क्षेत्रात काम करण्याची माझी इच्छा आहे. ’

ही इच्छा तिने फक्त कॉन्टेस्ट जिंकण्यासाठी व्यक्त केली नव्हती. मिस इंडियाचा मुकुट घातल्यानंतर स्वरूपने एम.ए. केले. नंतर डिसलेक्सियावर पीएचडी केली. आज ती ‘लर्निंग डिसअँबिलिटी’ असलेल्या मुलांसाठी काम करत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी तिला ‘गुजरात की मास्टरनी’ म्हणतात. ज्या गावात बसही जात नाही, अशा गावात स्वरूप महिन्यातील 15 दिवस काम करते.

महिला दिन आणि सबलीकरण या विषयावरून स्वरूपचे एक बोलणे मला आठवते. तिचे मत आहे की, ‘मी तर जन्मापूर्वी सबल झाले होते कारण माझ्या जन्माच्या वेळी मुलगीच व्हावी, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती.’ कोणत्याही वडिलांची अशी इच्छा असेल तर प्रत्येक मुलगी जन्मत:च सबल होईल. स्वरूपच्या वडिलांनी मुला-मुलीत कधी भेदभाव केला नाही. तिच्या भावाला जे मिळत होते, ते सर्वकाही तिला मिळाले.

मीसुद्धा तिला सांगितले होते,‘लग्नानंतर तू तुझे नाव बदलू नको. स्वरूप संपत असेच लिही.’ स्वरूपही कधी कधी हसून म्हणते, सगळ्या मुलींना माझ्यासारखे घर मिळो. गमतीशीर बाब म्हणजे स्वरूप शिक्षणासाठी इंग्लंडला गेली होती, तेव्हाही घरातील सर्व व्यवस्था तिथून हाताळत होती. मी तर कामात गुंतलेलो होतो, पण स्वरूपने तिच्या पद्धतीने सगळे काम पाहिले. ती घरात नसली तरी मला आणि माझ्या मुलांना ती नेहमी घरात असल्याचाच भास होतो. आम्हा तिघांची काळजी घेणे आणि घराचे सर्व व्यवस्थापन तीच पाहते. आज तुमच्याजवळ एक गोष्ट सांगू इच्छितो की, मी खूप नशीबवान आहे, मला सहचारिणी म्हणून स्वरूप मिळाली. तिने मला पूर्णपणे बदलले आहे.