आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला जिल्हा जिंदाबाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महासमुंद येथील कुठल्याही सरकारी कार्यालयात गेलात तर उच्च पदांवर महिला अधिकारीच भेटतील. येथे पोलिस अधीक्षक नीतू कमल यांच्या नुकत्याच झालेल्या नियुक्तीनंतर महासमुंद ‘महिला जिल्हा’ बनला आहे. काही दिवसांपूर्वी येथे एका नेत्याचा दौरा होता तेव्हा सर्वच महिला अधिकारी पाहून ते म्हणाले की, ‘हा महिला जिल्हा करून टाकला आहे का?’ त्यांना नवल वाटणे साहजिकच होते. येथे कलेक्टर, जिल्हा न्यायाधीश, एसपी, जिल्हा पंचायत सीईओ, एक्साइज ऑफिसर, पीआरओ अशा सर्वच पदांवर महिला अधिकारी आहेत. जिल्ह्याच्या जनसंपर्क अधिकारी इस्मतजहां दानी यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले की, बदलास प्रारंभ झाला आहे. मात्र, तो स्वीकारण्यास लोकांना काही काळ लागेल.

जिल्ह्यातील या ‘ऑल वुमन ऑफिसर्स’मध्ये उत्तम ताळमेळ आहे. जिल्हाधिकारी आर. संगीता यांनी 31 जुलै 2012 पासून जिल्ह्याची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या मते, ‘महिला सहकारी असल्याचा फायदा म्हणजे आम्ही आपसात मोकळेपणाने बोलू शकतो. कोणत्याही विषयावर बोलताना आधी विचार करावा लागत नाही की, काय बोलणे योग्य ठरेल? आमच्यात मैत्रीचे नाते असल्याने आपसात सहज ताळमेळ निर्माण होतो आणि त्याचा सकारात्मक परिणाम आमच्या कामावरही दिसून येतो.’

जिल्हाधिकार्‍यांच्या या मताशी जिल्हा पंचायतीच्या सीईओ शिखा राजपूतही सहमत आहेत. त्या म्हणतात की, ‘ऑल वुमन ऑफिसर’ असल्याने शेअरिंग व को-ऑर्डिनेशन खूपच चांगले होते. महिला बॉस पुरुष अधिकार्‍यांपेक्षा जास्त संवेदनशील असतात. त्यामुळे समस्येचा प्रत्येक पैलू त्या समजू शकतात. त्यांच्यापर्यंत पोहोचणेही सहजसोपे असते.

राज्यातील एकमेव अबकारी अधिकारी नीतू नुसानी यांनीही सर्व महिला अधिकारी असल्याचे अनेक फायदे सांगितले. त्या म्हणाल्या की, ‘पुरुष सहकारी, महिला अधिकार्‍यांना सहजपणे स्वीकारत नाहीत. एखाद्याविषयी त्यांना काही बोलल्यास त्यांच्या जिव्हारी लागते. तथापि, महिला एकमेकींना सहकार्य करण्याबरोबरच पुढे जाण्यासाठी प्रेरणाही देतात.’ नुसानी यांनी सांगितले की, ‘एखाद्या रात्री जर मी पोलिस बलाची मागणी केली तर महिला पोलिस अधिकारी प्राधान्याने मला मदत करील. मात्र, एखादा पुरुष अधिकारी या मागणीकडे कदाचित फारसे लक्षही देणार नाही. आमच्या जिल्ह्यात सर्वच महिला अधिकारी असल्याचे पाहून मला खूपच आनंद होतो. महिला सबलीकरणाचे याहून चांगले उदाहरण कुठे असेल.’

अधिकारी पद

आर. संगीता जिल्हाधिकारी

अनुराधा खरे जिल्हा व सत्र न्यायाधीश

शिखा राजपूत तिवारी सीईओ, जिल्हा पंचायत

नीतू कमल पोलिस अधीक्षक

नीतू नुसानी जिल्हा अबकारी अधिकारी

इस्मतजहां दानी जिल्हा जनसंपर्क अधिकारी

प्रियंका ठाकूर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

सरला कोसरिया जिल्हा पंचायत अध्यक्ष

किरण ढीढी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष

छाया चंद्राकर जनपद अध्यक्ष

राशी महिलांग नगराध्यक्ष

आरती पांडे जिल्हा क्रीडाधिकारी