आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन विशेष - कॅन्सरवर मात करून मिळवली पीएचडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महिला बचत गटाचे काम. अन् कायम महिलांच्या समस्या सोडवण्यात धन्यता मानणार्‍या प्रा. रेणुका भावसार यांना एप्रिल 2006 मध्ये कॅन्सरचे निदान झाले. तरीही चळवळीतील कार्यकर्ती असलेल्या रेणुका भावसार या डगमगल्या नाहीत. तब्बल दोन वर्षे कॅन्सरशी लढा देऊन त्या आता पूर्णपणे बर्‍या झाल्या आाहेत. दरम्यानच्या काळात केमोथेरपी व रेडिएशन्सची ट्रीटमेंट घेतानाच त्यांनी ‘जालना शहरातील बिडी कामगारांच्या सामाजिक अन् आर्थिक समस्या’ या विषयावर पीएचडीही पूर्ण केली.

महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी आर्थिक पाठबळ देणार्‍या जालन्यातील प्रा. रेणुका भावसार यांनी 1995 पासून बचत गटाचे काम सुरू केले. त्यांनी माविम., नाबार्ड, जलस्वराज्य, डीआरडीए इत्यादींच्या माध्यमातून ग्रामीण भागात तब्बल 575 बचत गट स्थापन केले, तर जालना शहरात 250 बचत गट स्थापन करून महिलांना उद्योजकीय प्रशिक्षण देण्याबरोबरच व्यवसाय उभारण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देण्याचे काम सुरू होते. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात 2006 मध्ये जलस्वराज्य प्रकल्पाचे काम सुरू होते. एप्रिलच्या सुरुवातीला त्यांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला. हा त्रास कमी न होता सातत्याने वाढत गेला. त्यामुळे त्यांनी औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात ट्रीटमेंट सुरू केली. त्यादरम्यान पोटातील आतड्यावर गाठ असल्याचे निदर्शनास आले. ही गाठ काढून तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आली. ती गाठ कॅन्सरची असल्याचे निदान झाले. तरीही त्यांनी न डगमगता समोर आलेल्या परिस्थितीशी लढा देण्याचे ठरवले अन् तेथून सुरू झाला कॅन्सरशी लढा.

एप्रिल 2006 मध्ये मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. सहा किमोथेरपी व 35 रेडिएशन्सची ट्रीटमेंट घेतली. दरम्यानच्या काळात म्हणजे 2006 च्या सुरुवातीलाच पीएचडीसाठी रजिस्ट्रेशन केले होते. केमोथेरपी व रेडिएशन्सची ट्रीटमेंट घेताना दरम्यानच्या काळात खूप वेळ मिळायचा. रिकाम्या वेळेत आराम करणे हे कधी माहीत नसल्यामुळे पीएचडीचा अभ्यास केला. केमोथेरपी उपचारामुळे तब्बल दोन वर्षांनंतर म्हणजे 2008 मध्ये कॅन्सर पूर्णपणे बरा झाला अन् 2009 मध्ये पीएचडीही पूर्ण झाली.

नथिंग इम्पॉसिबल - आपण जे ध्येय ठरवतो ते स्वत:ला वारंवार निक्षून सांगितल्यास ते साध्य करता येते. जगात अशक्य काहीच नाही. प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट शक्य होते.’’ - रेणुका भावसार, जालना