आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Pune
 • A. B. Marathi Literature Festival, The Tradition Of Centuries, The Tradition Of Dialect And The Literary Festival Of Marathi Literature.

अ. भा. मराठी साहित्य संमेलनात उजळणार स्मरणिकेचा 'पोत', शतकांची परंपरा, बोली आणि वास्तवाचा साहित्योत्सवात मेळ घालण्याचा प्रयत्न

2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
 • कॉपी लिंक

पुणे : उस्मानाबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'पोत' या वैशिष्ट्यपूर्ण शीर्षकाची स्मरणिका वेगळेपण जपणारी ठरणार आहे. उस्मानाबादचा शतकांचा इतिहास, प्राचीन वारसा, परंपरा, बोली, सांस्कृतिक संदर्भ आणि हे सारे सामावून घेणारे आजचे वास्तव, यांची गुंफण करत स्मरणिकेचा हा 'पोत' उजळणार आहे.

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित होणारी स्मरणिका नेहमीच संग्राह्य स्वरूपाची असावी, असा प्रयत्न केला जातो. त्यासाठी आयोजक मंडळी नेटाने प्रयत्न करतात. उस्मानाबादकरही याला अपवाद नाहीत. त्यामुळे शीर्षकापासूनच त्यांनी वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. 'पोत' ही संज्ञा अनेक अर्थांची वलये प्रकट करणारी आहे. 'पोत' हे महाराष्ट्राची कुलदेवता असणाऱ्या देवी तुळजाभवानीच्या जागरणाच्या निमित्ताने उजळली जाते आणि नाचवली जाते. प्रमाण भाषेतील 'पोत' संज्ञा दर्जा आणि स्पर्श संवेदनेशीही जोडली गेली आहे. हे सारे अर्थ या शीर्षकात सामावले आहेत, अशी उस्मानाबादकरांची भावना आहे.
 

आठ जणांचे संपादक मंडळ


बहुधा साहित्य संमेलनातील स्मरणिकेसाठी एखाद्या अनुभवी संपादकाची निवड वा नियुक्ती आयोजकांकडून केली जाते. उस्मानाबादने इथेही वेगळेपण जपले आहे. एकाच व्यक्तीला संपादक म्हणून न निवडता, त्यांनी संपादकांचे मंडळ नेमले आहे. रवींद्र अत्रे, बालाजी इंगळे, कमल नलावडे, बालाजी तांबे, भास्कर शेळके, डी. के. शेख, डॉ. प्रशांत चौधरी यांचा त्यात समावेश आहे. या मंडळात कुठेही अधिकारांची उतरंड नाही. सगळे मिळून स्मरणिकेचे काम पाहत आहेत.

असे असेल संमेलन स्मरणिका 'पोत'चे अंतरंग

 • बोलींवर प्रकाशझोत टाकणारे लेख
 • मराठवाड्यातील आजवरच्या साहित्य संमेलनांवर दृष्टिक्षेप
 • नोटबंदीनंतरचे उस्मानाबादचे वास्तव चित्र
 • उस्मानाबादच्या प्राचीन, ऐतिहासिक, स्वातंत्र्यपूर्व परंपरा, वारसा, संस्कृती यांचा वेध घेणारे लेख
 • संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ लेखक भास्कर चंदनशिव आणि सेतू माधवराव पगडी या तीन मान्यवरांचे परिचयलेख

बोलीभाषांना प्रथमच महत्त्वाचे स्थान

पोत ही स्मरणिका वाचकांच्या स्मरणात राहील, अशा पद्धतीने तयार केली आहे. बोलीभाषांना प्रथमच इतके महत्त्वाचे स्थान दिले गेले असावे. त्यासोबत 'पोत'मधून अनेक वेगळे विषय मांडण्यात आले आहेत. उस्मानाबादसारख्या छोट्या गावांतूनही साहित्य संमेलनासारखी प्रचंड 'इव्हेंट' साधेपणाने तरीही देखणेपणाने साकारता येते, याची झलक 'पोत'मधून मिळेल. - रवींद्र केसकर, कार्यवाह, उस्मानाबाद साहित्य संमेलन.
 

बातम्या आणखी आहेत...