बनोटी / निमचौकीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गावकऱ्यांनी ओढ्यावर बनवला बांबूचा पूल

दिलासा शैक्षणिक नुकसान टळले, शिक्षणासह ये-जा करण्याचा मार्ग झाला सुकर

Sep 23,2019 09:23:00 AM IST

निमचौकी येथील ओढ्यावर शिक्षक, ग्रामस्थांनी बांबूचा असा पूल बनवला.

बनोटी : बनोटी परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने परिसरातील नदी, नाले व धरणे भरून वाहत आहेत. परिणामी अनेक समस्या निर्माण होत आहेत. निमचौकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जायच्या रस्त्यावर मोठा नाला असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत हाेते. ते टाळण्यासाठी तेथील शिक्षक दत्ता देवरे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने दाेन दिवसात बांबूचा पूल करून विद्यार्थ्यांचा शाळेचा मार्ग सुखकर केला आहे.


सोयगाव तालुक्यात अतिशय दुर्गम भागात असलेली बनोटी केंद्रातील जि.प्र.प्रा.शा (वस्तीशाळा) निमचौकी खोरे येथील शिक्षक दत्ता माणिकराव देवरे यांनी डी.एफ.सी संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यातून विद्यार्थ्यांनी विविध समस्या शि‍क्षकांपुढे मांडल्या. रस्त्यातील ओढ्यामुळे शाळेत जाता येत नाही. त्यामुळे ही महत्वपूर्ण समस्या देवरे व विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांकडे मांडली. ओढ्यावर लाकडी पूल (सांकव) तयार करण्याचा उपायही विद्यार्थ्यांनी सुचवला. गावकऱ्यांची शाळेविषयी असलेली आत्मीयता, सहकार्याची भावना आणि विद्यार्थ्यांच्या समस्येचे निराकरण करण्याची तीव्र इच्छा. यातून निर्माण झाला लाकडी पूल (सांकव) यासाठी लागणारे बांबू, लाकडे, दोरी ज्यांच्याकडे उपलब्ध होते त्या ग्रामस्थांनी ते आपल्या घरुन आणून दिल्यानंतर शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी दोन दिवसांत नाल्यावर पूल तयार केला. बांबूच्या पुलावरून जाण्याचा विद्यार्थ्यांचा आनंद आणि उत्साह काही वेगळाच होता. आता विद्यार्थी नियमित शाळेत जात-येत आहेत. अनुपस्थितीचे प्रमाणही कमी झाले अाहे, असेही देवरे यांनी सांगितले. पूल तयार करण्यासाठी अर्जुन बोरसे, सुरेश पाचपुते, सांडू पाचपुते, अनिल पाचपुते, राहुल पाचपुते, अशोक बोरसे, बबलू बोरसे, धुडकू बागुल, मनोज गव्हांडे, योगेश मोरे, नंदू सोनवणे, गोविंदा पाचपुते, मंगेश बोरसे, राजेंद्र बोरसे, बापू पाचपुते, शिक्षक दत्ता देवरे, संघपाल इंगळे आदींनी परिश्रम घेतले.


पालकांच्या मदतीमुळे शक्य
जिल्हा परिषद शाळा डिजिटल होत आहेत. परंतु निम चौकी ही अजिंठा डोंगर रांगांच्या कुशीत अतिदुर्गम भागात आहे. येथे येण्यासाठी जेमतेम पायवाट आहेत त्याही नदी नाल्यातून. यामुळे येथील शाळेतील विद्यार्थी संख्या कमी व पावसाळ्यात नदी नाले दुथडी वाहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी मी हे विद्यार्थी व पालकांना सांगून हा बांबूचा पूल बनवला. पालकांच्या व ग्रामस्थांच्या मदतीमुळे हे शक्य झाले, असे शिक्षक दत्ता देवरे यांनी सांगितले.


शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न... शाळेतील लहान मुले व शिक्षक आमच्याकडे आले व नाला ओलांडून शाळेत जायला लाकडी पूल करून देण्यासाठी आग्रह केला. माझ्या शेतात बांबू आहे त्यांचा उपयोग करून घेतला. मदत लागली तर सहकार्य करू, असे अर्जुन बोरसे यांनी सांगितले.

X