नुकसान भरपाई / राज्यातील ९५ हजार शेतकऱ्यांना ६३ कोटींची नुकसान भरपाई

औरंगाबाद, अमरावतीत सर्वाधिक शेतकऱ्यांना लाभ
 

प्रतिनिधी

May 16,2019 09:48:00 AM IST

नागपूर - पंतप्रधान खरीप हंगाम २०१७ मध्ये पीक विमा योजनेत नुकसान भरपाई मिळावी यासाठी ऑफलाइन अर्ज भरणाऱ्या राज्यातील सुमारे ९५ हजार ८४७ शेतकऱ्यांना कृषी विभागाने ६३ कोटी ५४ लाख २१ हजार ९४२ एवढी नुकसान भरपाई जाहीर केली असून तसा शासन निर्णयही जारी केला आहे. यामुळे आधीच दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


पंतप्रधान पीक विमा योजनेत नुकसान भरपाई मिळण्यासाठी सर्व अर्ज आॅनलाइन भरून घेतले जातात. मात्र, २०१७ मध्ये ३१ जुलैपर्यंत तांत्रिक कारणांमुळे राज्यातील अनेक शेतकरी अर्ज भरू शकले नाहीत. अर्ज भरू न शकलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी पुढे आली. सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत १ ते ५ आॅगस्ट २०१७ अशी पाच दिवसांची मुदतवाढ देऊन आॅफलाइन अर्ज भरण्यास मान्यता दिली.


औरंगाबाद, अमरावतीत सर्वाधिक शेतकरी
२०१७ खरीप हंगामात आॅफलाइन अर्ज करणाऱ्यांत सर्वाधिक ४०,९७० शेतकरी अमरावती विभागातील आहेत, तर त्यानंतर २६,८६४ शेतकरी औरंगाबाद विभागातील आहेत. याशिवाय पुणे ३,६२२, कोल्हापूर २,२०१, लातूर १९,१६५, नागपूर १,७४८ शेतकरी आहेत.

X
COMMENT