आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंजक... चिमुकल्याने लावला २७ वर्षांपासून बेपत्ता महिला व कारचा शोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडातील ब्रिटिश कोलंबियातील एका १३ वर्षाच्या मुलाने २७ वर्षांपूर्वी गायब झालेली महिला शोधून काढली. मॅक्स व्हेरेंका नावाच्या या मुलाचे निसर्गावर खूप प्रेम आहे. तो अनेकदा त्याच्या गो-प्रो कॅमेऱ्याने फोटो काढत असे. काही दिवसांपूर्वी तो ग्रिफिन तलावाच्या किनारी फोटो काढत होता. एवढ्यात त्याला पाण्यात काही चमकताना दिसले. त्याने पालकांना तेथे बोलावून नेले. जवळ जाऊन पाहिले, तेव्हा ती कार असल्याचे कळले. कुटुंबीयांनी पोलिसांना याविषयी माहिती दिली. पण पोलिस पोहोचले तेव्हा तलावाचे पाणी खूप गढूळ झाले होते, खाली काहीही दिसले नाही. यावर मॅक्सने पोलिसांची मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला. मॅक्स म्हणाला, गो-प्रो कॅमेऱ्याच्या मदतीने पाण्याच्या आतील फोटो व व्हिडिओ तयार करता येऊ शकतो. त्यामुळे पाण्यात काय आहे, हे पाहता येईल. त्यानंतर मॅक्स कॅमेरा लावून पाण्यात उतरला आणि आतील व्हिडिओ तयार करून बाहेर घेऊन आला. नंतर तीन दिवसांनी पोलिसांनी ती कार तलावातून बाहेर काढली, त्यात त्यांना एका महिलेचा मृतदेह सापडला. व्हँकुव्हर येथे राहणाऱ्या जॅनेट फॅरिस नामक ६९ वर्षीय महिला १९९२ पासून बेपत्ता होत्या. गेली २७ वर्षे त्यांच्याविषयी कुणालाही माहिती नव्हती. मॅक्सला अनेक वस्तूंचे निरीक्षण करण्याची सवय आहे. पण ही सवय २७ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेचा शोध घेण्यासाठी उपयोगात येईल, याची कल्पना कुणालाही नव्हती. पोलिसांनी सांगितले की, काळ्या रंगाची ती कार बाहेर काढली, तिचा क्रमांक तपासला तेव्हा ती जॅनेटची कार असल्याचे कळले. १९९२ मध्ये जॅनेट बेपत्ता झाल्या होत्या. अलबर्टा येथे एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी त्या जात होत्या. पोलिसांच्या अंदाजानुसार, एखाद्या वन्य प्राण्यापासून बचाव करण्यासाठी किंवा कारवरील नियंत्रण गमावल्यामुळे जॅनेट यांची कार तलावात पडली असेल. 

बातम्या आणखी आहेत...