आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना येथून अपहरण करून औरंगाबादेत कारमध्ये डांबून ठेवलेल्या व्यापाऱ्याची सुटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना : आर्थिक व्यवहारातून नुकसान झाल्याचा राग मनात धरून एका ठेकेदाराने अाेळखीतील व्यापाऱ्याला मंगळवारी सकाळी ११ वाजता कॉफीतून गुंगीचे औषध देऊन जालन्यातून अपहरण करत औरंगाबाद येथे कारमध्ये डांबून ठेवले होते. पोलीसांनी बुधवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास त्या व्यापाऱ्याची सुखरुप सुटका केली. शंकरलाल बिरदुराम शर्मा असे सुटका झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून, झाकीर यासीन राठोर (४५) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, गुंगीच्या औषधाचा अंमल जास्त असल्याने शर्मा यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

जालना शहरातील सकलेचा नगर भागातील शंकरलाल शर्मा हे मंगळवारी सकाळी घरच्यांना सांगून चारचाकी वाहनाने औद्योगिक वसाहतीत गेले होते. परंतु काही तासांनी त्यांचा फाेन लागत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली. परंतु, ते कुठेच मिळून न आल्याने मुलाने तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी तांत्रिकदृष्टीने तपास केला असता संशयित आरोपी झाकीर यासीन राठोर याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली होती. तपासातील माहितीनुसार झाकीर राठाेर याने शर्मा यांना गोडाऊनवर नेऊन कॉफी पाजली. कॉफीत अगोदरच गुंगीचे औषध टाकले होते. यामुळे शर्मा यांना गुंगी आल्यामुळे ते बेशुद्ध झाले होते. यानंतर राठोर याने त्यांची गाडी गोडाऊनवर लावून त्याच्या कारमध्ये बसवून त्यांना पंढरपूरकडे नेले. परंतु, पुन्हा प्लॅन बदलत त्याने व्यापाऱ्यास औरंगाबाद येथील शेंद्रा एमआयडीसीसमोर एका कारमधून सुटका केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, डीवायएसपी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय देशमुख, सहायक निरीक्षक शिवाजी नागवे, रमेश रूपेकर, गणेश झलवार, सुधाकर मगरे, अशोक जाधव, दीपक घुगे, समाधान तेलंग्रे, संदीप बोंद्रे, रमेश फुसे, सुधीर वाघमारे, साई पवार, सोपान क्षीरसागर, स्वप्नील साठेवाड आदींनी ही कारवाई केली. आरोपी हा औद्योगिक वसाहतमध्ये कामगार पुरवणारा गुत्तेदार आहे. गुंगीच्या औषधींचा परिणाम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे १८ तास शर्मा हे गुंगीतच होते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

कॉफीत गुंगीचे औषध टाकणाराही पोलिसांच्या रडारवर

आरोपी झाकीर राठोर व व्यापारी शर्मा यांच्यात आर्थिक व्यवहार असल्यामुळे त्यांची एकमेकांची चांगली ओळख होती. यामुळे त्यांना गोडाऊनमध्ये नेले. या ठिकाणी राठोर याच्या ड्रायव्हरने त्यांना कॉफी दिली. कॉफी देणाऱ्याचाही या प्रकरणाशी संबंध आहे का, यासाठी तो पोलिसांच्या रडारवर आहे.
सुटकेनंतर उपचार घेताना शंकरलाल शर्मा.

पुराव्याआधारे तपास

तांत्रीक पुराव्याआधारे अपहरणाचा गुन्हा उघड करता आला आहे. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अजून कुणाचा यात सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. संजय देशमुख, पोलीस निरीक्षक, सदर बाजार, जालना.