पाकिस्तान / पाकिस्तानात एका ख्रिश्चन मुलीचे बळजबरीने केले धर्मांतर; मागील दोन आठवड्यातील तिसरी घटना

शालेय शिक्षकाने पीडितेला मदरसात बळजबरीने मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले
 

Sep 08,2019 02:14:46 PM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका शालेय शिक्षकाने 15 वर्षीय ख्रिश्चन मुलीचे बळजबरीने धर्मांतर केले. फैज मुख्तार असे पीडितेचे नाव आहे. एखाद्या मुलीचे बळजबरीने धर्मांतर करण्याची मागील दोन आठवड्यातील तिसरी घटना आहे. पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतने शनिवारी ट्वीट करून घटनेची माहिती दिली.


फैज शेखपुरातील एका सरकारी शाळेत शिकत होती. तिच्या शाळेतील शिक्षक फैजला मदरसेत घेऊन गेला आणि तिथे बळजबरीने तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. नायलाच्या मते, मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर पीडितेला आपल्या घरी जाता येत नसल्याचे शिक्षकाने सांगितले.


शिक्षक मुलींना अरबी शिकवतो
नायलाने सांगितले की, मुलीच्या कुटुंबीयांचे देखील बळजबरीने धर्मांतर करण्यात आले आहे. शाळेतील शिक्षक मुलींना अरबी शिकवत होता. नायलाने ट्वीट केले,'पाकिस्तानात आणखी एका मुलीचे बळजबरीने धर्मपरिवर्तन. मुलीच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे की, तिला एका मदरसात नेऊन तिचे धर्मपरिवर्तन केले. आता या गरीब परिवाराचे देखील धर्म परिवर्तन करण्यात आले.'

बंदुकीचा धाक दाखवत शिख मुलीचे केले होते अपहरण
एखाद्या अल्पसंख्यक घटकातील मुलीचे कथितरित्या मुस्लिममध्ये धर्म परिवर्तन करण्याची मागील 10 दिवसांतील ही तिसरी घटना आहे. याअगोदर 27 ऑगस्ट रोजी कट्टरपंथिंनी लाहोरमध्ये जगजीत कौर या शिख मुलीचे अपहरण करून तिचे धर्मपरिवर्तन केले होते. यानंतर 2 सप्टेंबर रोजी सिंध प्रांतातील रेणुका कुमारी या हिंदू मुलीचे धर्म परिवर्तन केल्याची घटना समोर आली होती.

X