आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यात्म, विज्ञान व तंत्रज्ञानाचा घातला मेळ, २६ गावांत यशस्वी गटशेती; कमी खर्च, पाणी व दुष्काळावर करतात मात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना, औरंगाबाद व बुलडाणा जिल्ह्यातील २६ गावांतील तीन हजारांवर शेतकरी एकत्रित येऊन अध्यात्म, विज्ञान, ज्ञान, तंत्रज्ञानाच्या मेळ घालून कमी खर्चात, कमी पाण्यात, दुष्काळावर मात करून यशस्वी शेती करत आहेत. यांच्या सहकार शेती व गटशेतीचा आदर्श राज्य सरकारने घेतला असून राज्यात नवीन गटशेतीची योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. 
 

प्रबोधनाबरोबरच शेतीचे नियोजन
अकोला देव, दळणे गव्हाण, खामखेडा नागवे, डोणगाव, लिंबखेडा, नांदखेडा, वरूड बु., उमेरखेडा, पोखरी,  गिरोली, सावरगाव म्हस्के, टेंभूर्णी, भातोडी, दाभाडी चिखली, जवखेडा ठेंग, दगडवाडी, आडगाव सरग, शहर पळशी, डोणवाडा, नायगव्हाण, लामकाना, वडखा, माहुली, अंजन डोह, मुरूम खेडा, धनगर पिंप्री या गावातील ३ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे.  


डुकरे येथे द्वादशीचा १७१ वा कार्यक्रम 
शेती मशागत, पेरणी आणि लागवड, काढणीसाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर, एकात्मिक पीक पद्धती, पिकांच्या गरजेनुसार पाण्याचा वापर, बाजारपेठेचा अंदाज घेऊन शेतमालाचे विक्री व्यवस्थापन करण्यासाठी द्वादशी कार्यक्रम दर महिन्याला घेतला जातो.  १७० वा द्वादशीचा कार्यक्रम ३० जून रोजी जालना जिल्ह्यातील भातोडी येथील रामेश्वर गायके यांच्या शेतात पार पडला. तर येत्या २९ जुलै रोजी सावरगाव डुकरे येथे द्वादशीचा १७१वा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.


भेंडी निर्यातीसाठी नियोजन 
गटशेतीच्या माध्यमातून यंदा ४० एकरावर निर्यातक्षम भेंडी लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने थ्री सर्कल एक्स्पोर्ट मुंबई यांच्याशी करारदेखील केला आहे. अशी माहिती गटशेतीचा प्रणेते डॉ.भगवान राव कापसे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. 


दोन गावांत  केले जाते नियोजन
दरमहिन्याला द्वादशी कार्यक्रमासाठी दोन गावात नियोजन केले जाते. सकाळच्या सत्रात पहिल्या गावात नाहीरी व शिवारफेरी तर दुसऱ्या गावात द्वादशीचे जेवण असा अभिनव उपक्रम राबवला जातो. या माध्यमातून सर्व शेतकरी एका ठिकाणी येतात. ईश्वराचे नामस्मरण करून एकादशीचे स्नेहभोजन करतात. त्यानंतर शेत, शेतमाल, अडीअडचणीवर मात करण्यासाठी शेतशिवारावर जावून पिकांची पाहणी आणि उपाययोजनेबाबत विचार विनिमय व त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली जाते. पीक लागवड ठरवणे ते कीड रोगाचा प्रादुर्भाव रोखणे या शेतकऱ्यांना शक्य होते.  सेंद्रिय व रासायनिक खतांचा समतोल वापर केला जातो. सामाजिक दायित्व म्हणूनही संघ शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जातात. 


३५०० एकरावर कापूस लागवड पूर्ण 
सिंचनची सोय करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी मान्सूनचा पाऊस पडणारच, या आशेवर जूनच्या पहिल्या आठवड्यात साडेतीन हजार एकरावर कपाशी लागवड पूर्ण केली आहे. त्यातही ५०० एकरात एक वाटणाची लागवड केली. तर वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठातर्फे संशोधन केलेल्या नांदेड ४४ कपाशी वाणाची ४ एकरावर लागवड करून पीक प्रात्यक्षिक घेतले आहे. दुष्काळात एकरी सरासरी १० ते २० क्विंटल उत्पादन घेतल्याची नोंदही घेण्यात आली आहे. 


तंत्रज्ञान, पर्यायी व्यवसायाची जोड 
२० शेडनेट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक शेतीला प्राधान्य दिले जाते.  तीन पोल्ट्री फार्म, दोन गोट फार्म हाऊस आहेत. दूध डेअरी आहे. म्हणजेच शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी, कोंबडी, पशुधन पालनासदेखील महत्त्व दिले आहे. महिला गृह कामाबरोबरच शेतातील कामकाजातही हिरिरीने सहभागी होतात. डाळ, तिखट, लोणच, दुग्ध पदार्थ आदी घरगुती प्रक्रिया उद्योग करून कुटुंबाच्या आर्थिक विकासाला हातभार लावतात.


फडणवीस यांनीही लावली हजेरी
१४६ व्या द्वादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा द्वादश कार्यक्रमाला हजेरी लावून गटशेतीची माहिती घेतली. या शेतकऱ्यांची यशस्वी शेती पाहून महाराष्ट्रात गटशेतीसाठी २०० कोटी रुपयांची योजना लागू केली. यामध्ये २० शेतकरी कमीत कमी आणि १०० एकर शेती असणाऱ्या गटाला १ कोटी रुपये भरीव अनुदान देण्याची अभिनव तरतूदही केली आहे.   जालना, औरंगाबाद, बुलडाणा  जिल्ह्यातील २६ गावांतील शेतकऱ्यांनी एकत्रित येत १६ शेतकरी गट तयार केले आहेत. अधिकृत नोंदणी कृषी विभागाकडे केली आहे. प्रती गटात २० शेतकऱ्यांचा समावेश आहे. मात्र, इतर ३१०० पेक्षा अधिक  शेतकरी यात सहभाग घेऊन यशस्वी शेती करतात. त्यात ५ हजार हेक्टर शेती क्षेत्र असून ३ हजार हेक्टरवर ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.  

 

 

बातम्या आणखी आहेत...