Home »Mukt Vyaspith» A Day Making Sad Mind

मन खिन्न केलेला दिवस

प्रा. खुशाल कांबळे, पाचोरा, जि. जळगाव | Feb 21, 2013, 02:00 AM IST

  • मन खिन्न केलेला दिवस



महाराष्ट्र एक्स्प्रेसने चाळीसगाव-पाचो-यादरम्यान 9 फेब्रुवारी रोजी केलेला प्रवास एकदम मन खिन्न करणारा व मनात कायमचा घर करणारा ठरला. गाडीने चाळीसगाव सोडले व कजगावदरम्यान मी उभा असलेल्या डब्यात गोंधळ सुरू झाला. नीट चौकशी करीत असतानाच चार तृतीयपंथी चक्क दहा-दहा रुपये वसूल करू लागले. पैसे देण्यास कुणी मागेपुढे करतो, असे दिसताच तोंडावर डोक्यावर पाठीवर चापटा मारायचे.

पुण्याकडून येणारे मलिन चेह-याचे गरीब लोक हे त्यांचे लक्ष्य होते. ते गेल्यावर गाळण-पाचो-यादरम्यान पुन्हा गोंधळ सुरू झाला. पोलिस चक्क झोपलेल्या व बसलेल्या लोकांना लाथा मारून उठवायचे. त्याला नाव गाव विचारायचे व हिंदी भाषिक, बिहारी असल्याचे समजताच त्याला दोघे-दोघे लाथाबुक्क्यांनी मारायचे. पाहून खूप वाईट वाटायचं. ते बिचारे काहीही प्रतिकार करीत नव्हते. गुपचूप मार खात होते. तृतीयपंथीयांना पैसे देऊन सुटका करून घेता येत होती. इथे तसेही करता येत नव्हते. सर्वजण धष्टपुष्ट व तरुण होते. मी त्यांना आपली नाराजी दाखवली, पण त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही, पण माझ्यावर खूप परिणाम झाला. आपला भारत, आपले पोलिस, आपलं स्वातंत्र्य, कायद्याचा पडणारा कीस... सर्व कसं व्यर्थ-व्यर्थ... खिन्न करणारं. रेल्वे प्रवासात असे अनुभव नेहमी येतात. मनमाडदरम्यान माझ्या मित्रास असाच अनुभव आला. गाडीत भीक मागणा-या मुलांस प्रतिबंध करताच त्या मुलांने त्याला शिवीगाळ केली.

Next Article

Recommended