आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ. पायल आत्महत्याप्रकरणी एक डाॅक्टर अटकेत; आरोपी दोघी डाॅक्टर अद्याप मात्र फरार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. पायल तडवीच्या कुटुंबीयांची वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. - Divya Marathi
डॉ. पायल तडवीच्या कुटुंबीयांची वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

मुंबई - नायर हॉस्पिटलमधील स्त्रीरोग विभागात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी डॉ. भक्ती मेहेरला अटक केली. इतर दोघी डाॅक्टर फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या डॉ. मेहेरला शिवडी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, पायल आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले आहे.


गेल्या वर्षभरापासून डाॅ. पायल तडवीसोबत तिघी सहकारी डाॅक्टर तिला जातिवाचक टिप्पणी करत छळत होत्या. हा त्रास असह्य झाल्याने पायलने गेल्या बुधवारी नायर रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर प्रसूती विभागातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी आणि रॅगिंगविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले. पायलचे आई-वडील नायर रुग्णालयाबाहेर मंगळवारी आंदोलनास बसले होते. तसेच मुंबईतील विविध सामाजिक संघटनांनी आज रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली. त्यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. 


त्रिसदस्यीय समिती 
डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी कुणालाही माफी मिळणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पायलच्या कुटुंबीयांना दिले. दरम्यान, तिच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. दरम्यान, याप्रकरणी पोलिस सर्व बाजुंनी तपास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.