Kidnapping / आजी-चुलत्याला मारहाण करत तरुणीचे अपहरण, पोलिसांत गुन्हा दाखल

गेल्या सात महिन्यांत चार मुली बेपत्ता
 

प्रतिनिधी

Jun 16,2019 12:38:00 PM IST

केज - लातूरच्या सात जणांनी आजी व चुलत्यास मारहाण करून १९ वर्षीय तरुणीस बळजबरीने जीपमध्ये बसवून अपहरण केल्याची घटना तालुक्यातील टाकळी गावात गुरुवारी (दि. १३ जून) घडली. या प्रकरणी केज पोलिसांत सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.


टाकळी येथील १९ वर्षीय तरुणी मागील वर्षी बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर नीटच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी लातूरला गेली होती. तिचा भाऊ व ती एका खोलीत राहत असताना ७ मे २०१८ रोजी ती अचानक बेपत्ता झाली होती. लातूर पोलिसांत या प्रकरणी ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सात महिन्याने म्हणजेच ३ जानेवारी २०१९ रोजी तरुणीने टाकळी येथे घरी येऊन विलास अशोक करडे (रा. लातूर) याने आपल्याला बळजबरीने पळवून नेल्याचे कुटुंबातील लोकांना सांगितले होते. ती घरी राहत असताना विलास करडे याने तिला कोर्टामार्फत नोटीस पाठवली होती. कोर्टाने तिला हजर राहण्याचे आदेशही दिले होते. तेंव्हा तरुणीने आई वडिलांकडे गावी राहणार असल्याचा जवाब कोर्टात दिला होता. त्यानंतर १३ जून २०१९ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास सदरील तरुणी ही टाकळी येथे आपल्या घरी असताना तेथे विलास करडे, त्याचे वडील अशोक करडे, आई सुनीता करडे व त्याचे दोन मेव्हणे हे एका जीपमधून आले. त्यांनी या तरुणीस बळजबरीने जीपमध्ये बसवले. याच वेळी तरुणीच्या आजीने विरोध केला असता आजीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान तरुणीच्या चुलत्यालाही त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तरुणीचे जीपमधून अपहरण केले. तरुणीच्या वडिलांनी केज ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून लातूर येथील ७ जणांवर गुन्हा दाखल झाला. तपास जमादार धनपाल लोखंडे करत आहेत.

लातूरला जाऊन तरुणाचा शोध घेतला
या प्रकरणात तरुणीने विलास अशोक करडे (रा. लातूर) याच्याबरोबर मे २०१८ मध्ये आळंदी येथे जाऊन लग्न केले होते. त्यानंतर ही तरुणी तरुणाकडे सात महिने राहिली होती. आम्ही लातूर येथे जाऊन तरुणाचा शोध घेतला. तो सापडला नाही. त्याचा शोध सुरू आहे. सुनील बिर्ला, पोलिस निरीक्षक, केज.

सात महिन्यांत चार मुली बेपत्ता
केज शहरातील तरुणी बारावीच्या परीक्षेला जाते म्हणून घरातून बाहेर पडली होती. ती काही दिवस घरी पोहोचलीच नव्हती. फुलेनगरातूनही एक तरुणी बेपत्ता झाली होती. परळी तालुक्यातील एक तरुणी टाकळीत उन्हाळी सुटीत मावशीकडे आली होती. मावशीकडे काही दिवस राहिल्यानंतर ती परत परळीकडे जाते म्हणून निघाली असता ती घरी पोहाेचली नव्हती.

X
COMMENT