आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
परभणी : ऑटोरिक्षा चालक असलेल्या वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी सायकलवर आलेल्या शाळकरी मुलीचा महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या टेम्पोखाली सापडून जागीच मृत्यू झाला. सोमवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. श्रुती नागोराव भराडे(१२) असे या मुुलीचे नाव आहे.
नांदखेडा येथील रहिवासी असलेले नागोराव भराडे हे वांगी रस्त्यावर वास्तव्यास आहेत. ते ऑटोरिक्षा चालवतात. सोमवारी ते विद्यानगर कॉर्नर येथे उभे होते. त्यांची मुलगी श्रुती ही सायकलवरून त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी आली होती. तिने वडिलांच्या हाती डबा स्वाधीन केला. घरून आणलेले काही पैसे देखील तिने वडिलांना दिले व परत निघत असतानाच वैष्णवी मंगल कार्यालयाकडून आलेल्या महापालिकेच्या कचऱ्याच्या टेम्पोचा (एम.एच.२२- एम.एम.०७१९) तिच्या सायकलला धक्का लागला. त्यामुळे ती तेथेच पडली. याच दरम्यान, टेम्पोच्या पाठीमागील भाग श्रुतीच्या डोक्याला लागल्याने जागीच रक्तबंबाळ होऊन तिचा मृत्यू झाला.
टेम्पाेचालक पसार
घटना घडताच मोठा जमाव एकत्र आल्याचे पाहताच टेम्पोचालक घटनास्थळावरून फरार झाला. जमावाने टेम्पोवर दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळताच नानलपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती अाटोक्यात आणली. श्रुतीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी परिसरात तिचे नातेवाइक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. श्रुतीला आई, वडिलांसह एक बहीण असून तिच्या या काही क्षणातील झालेल्या मृत्यूने शहरात मोठी हळहळ व्यक्त होत होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.