आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Grieving Checkmate To Son's Death; 73 year old Retirees To Become King Of Chess

मुलाच्या अकाली निधनाच्या दु:खाला चेकमेट; 73 वर्षीय निवृत्ती ठरताेय चौसष्ट घरांचा 'किंग'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला : निवृत्तीनंतर मिळालेल्या निधीतून कसेतरी जीवन काढायची सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांची धारणा असते. मात्र, विचाराने तरुण असलेल्या ७३ वर्षीय निवृत्ती यांनी याच पारंपरिक वाटेवर न जाता, आपली वेगळी वाट निवडली. उतारवय आणि याच काळात तरुण मुलाच्या अकाली निधनाचे माेठे दु:ख. मात्र, या साऱ्या परिस्थितीमध्ये किंचितही खचून न जाता, याच दु:खाला चेकमेट देण्याचे माेठे धाडस त्यांनी दाखवले. यातूनच सेकंड इनिंगमध्ये मनसोक्त बुद्धिबळ खेळण्याचा आनंद लुटणारे निवृत्ती' वेगळे ठरत आहेत. या ७३ वर्षांच्या चिरतरुणाचे अखिल भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत बुद्धिबळाच्या पटावरील भन्नाट डाव भल्याभल्यांना अचंबित करतात, हे विशेष.


निवृत्ती इंगळे मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षक कॉलनी येथील रहिवासी. ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. वैयक्तिक आयुष्यातील एका कठीण प्रसंगी त्यांना बुद्धिबळाच्या पटाने सहारा दिला आणि आज त्यांच्यासोबत संपूर्ण कुटुंबीयही खेळाचे चाहते झाले.


निवृत्तीनंतर इंगळेंनी त्यांच्या परिसरात बुद्धिबळाच्या प्रचाराचे कार्य जोमाने हाती घेतले. बुलडाण्यात या खेळाचा प्रसार होण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे ते मार्गदर्शक व प्रशिक्षक आहेत. ते स्वत: विविध स्पर्धांत सहभागी होतात आणि इतरांनाही खेळण्यास प्रोत्साहन देतात. या खेळावरचे त्यांचे प्रेम व खेळतानाचा उत्साह उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरतो, हे निश्चित.

विश्वनाथन आनंदला भेटण्याची इच्छा
आयुष्यात एकदा तरी ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला भेटायची इच्छा आहे. त्याला बुलडाण्यात बोलवायचे आहे. यासाठी एक मोठी स्पर्धा शहरात घेणार आहोत. आतापर्यंत बरेच प्रयत्न करूनही, विश्वनाथनशी संपर्क झाला नाही. मात्र आमचे प्रयत्न अद्याप सुरू असल्याचे निवृत्ती म्हणाले.

बुद्धिबळाने जीवनाला दिली संजीवनी
साधारण २० वर्षांपूर्वी निवृत्तींच्या एक तरुण मुलाचा मृत्यू झाला आणि त्यांची जगण्याची ऊर्मी संपली. स्वत:ला व्यग्र ठेवण्यासाठी त्यांनी बुद्धिबळाचा सहारा घेतला. मुलाच्या मृत्यूचे दु:ख विसरण्यासाठी या खेळाची मोठी मदत झाली. बुद्धिबळाने माझ्या जीवनाला नवसंजीवनी दिल्याचे निवृत्ती सांगतात.
 

बातम्या आणखी आहेत...