पुणे / सोयगावच्या दिंडीत सहभागी झालेल्या श्वानाचे सर्वत्र होत आहे कौतुक, दोन पाय निकामी असतानाही तीनशे किमीचा टप्पा पार करत पंढरपुरात पोहोचले

किर्तन-भजनाच्या ठिकाणी मध्यभागी बसून विठ्ठल रुख्मिणीच्या नाम स्मरणात तल्लीन व्हायचे श्वान 
 

संदीप शिंदे

Jul 10,2019 01:23:00 PM IST

माढा - आषाढी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुख्मिणीच्या भेटीने तृप्त झालेल्या वारकऱ्यांची मांदियाळी पंढरपुरच्या दिशेने कुच करीत आहे. माढ्यातून शेकडो पालखी सोहळे व पायी दिंड्या शेटफळ मार्गे पंढरपुरच्या दिशेने असतात.


एक श्वानाची विठ्ठल भक्ती समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील सोयगाव येथील पावनधाम आश्रमापासून निघालेल्या संत ज्ञानराज महाराज दिंडीत दोन पायाने अपंग असलेले एक श्वान तीनशे किलोमीटरचा टप्पा पार करीत दिंडीसोबत चालत आले आणि पंढरीत देखील पोहचले आहे.


हे श्वान पालखी समवेत सुरुवातीपासून चालत आले आहे. बीडमध्ये एकदा चुकले देखील होते मात्र ते आमच्या दिंडीत पुन्हा सहभागी झाले. वारकऱ्यांनी विसावा घेतला की किर्तन-भजनाच्या ठिकाणी हे श्वान मध्यभागी बसून विठ्ठल रुख्मिणीच्या नाम स्मरणात तल्लीन होते असे दिंडीतील वारकऱ्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांबरोबर हे श्वान चालत विठुरायाकडे चालले आहे. वारकऱ्यांनी त्याच्या गळ्यात हार देखील घातला आहे. विशेष म्हणजे तो पुढील दोन्ही पायाने अपंग आहे. या श्वानाची विठ्ठल भक्ती चर्चेचा विषय ठरत आहे. गत वर्षी गजानन महाराज पालखी सोहळ्यासोबत हरिण आले होते.

X
COMMENT